होम क्वारंटाईनमधील रुग्णांची झाडाझडती घेणार; हलगर्जीपणा केल्यास थेट पोलीस कारवाई

होम क्वारंटाईनमधील रुग्णांची झाडाझडती घेणार; हलगर्जीपणा केल्यास थेट पोलीस कारवाई

होम क्वारंटाईन

मुंबईमध्ये कोरोनाची रुग्णसंख्या दिवसेंदिवस वाढत आहे. त्यामुळे अनेकांना होम क्वारंटाईनमध्ये ठेवण्यात येत आहे. आता होम क्वारंटाईनमधील रुग्णांची झाडाझडती घेण्यात येणार असून हलगर्जीपणा केल्यास रुग्णांवर थेट पोलीस कारवाई होणार आहे. होम क्वारंटाईनमधील एकूण रुग्णांपैकी किमान १० टक्के रुग्णांच्या घरी समर्पित वैद्यकीय पथकाने दररोज आळीपाळीने भेट देऊन सर्व बाबींची पडताळणी करावी. रुग्ण किंवा संबंधितांनी नियमांचे उल्लंघन केल्याचे आढळल्यास त्यांच्यावर कायद्यानुसार कारवाई करावी. रुग्णास कोरोना काळजी केंद्रात (सीसीसी २) स्थलांतरित करावे. तसेच त्या रुग्णांनी सहकार्य न केल्यास त्यांच्याविरुद्ध पोलिसात तक्रार दाखल करावी, असे कडक आदेश मुंबई महापालिका आयुक्त इकबाल सिंह चहल यांनी पालिका प्रशासनाला दिले आहेत.

होम क्वारंटाईन असलेले बरेच रुग्ण कोरोनासंदर्भातील नियमांचे पालन करीत नाहीत. ते मोकाट बाहेर फिरतात. त्यामुळे कोरोनाचा प्रादुर्भाव वाढण्याची शक्यता आहे. ही गंभीर बाब पालिका प्रशासनाच्या निदर्शनास आल्याने पालिका आयुक्त चहल यांनी होम क्वारंटाईन रुग्णांबाबत कडक नियमावली असलेले परिपत्रक जारी केले आहे. त्यामध्ये रुग्ण, नातेवाईक यांच्यासह वैद्यकीय मंडळी व वॉर्ड वॉर रुम यांना विविध निर्देश देण्यात आले आहे.

सध्या मुंबईत कोरोनाचा प्रादुर्भाव वाढू लागला असून रुग्ण संख्येत मोठी वाढ होऊ लागली आहे. या बाधितांमध्ये लक्षणे नसलेल्या बाधितांची आणि सौम्य लक्षणे असलेल्यांची संख्या मोठ्या प्रमाणावर आहे. त्यांना बहुतांशी होम क्वारंटाईन करुन औषधोपचार दिले जातात. त्यामुळे पालिका प्रशासनाने याची गंभीर दखल घेत कोरोनाला रोखण्यासाठी तात्काळ विविध उपाययोजना करण्याचे आदेश चहल यांनी दिले आहेत.

होम क्वारंटाईनसाठी पात्रतेचे निकष

जे रुग्ण कोरोना चाचणी केल्यानंतर बाधित आढळले आहेत, अशा रुग्णांना होम क्वारंटाईन करता येऊ शकते. त्यासाठी लक्षणे नसलेल्या बाधित (एसिम्प्टोमॅटिक) आणि सौम्य लक्षणे असलेल्या रुग्णांना (म्हणजे ज्यांना सहव्याधी नाहीत, ताप १०० फॅरनहाईटपेक्षा कमी आहे, ऑक्सिजन पातळी ९५ पेक्षा अधिक आहे व इतर सामान्य निकष, प्रौढ व सहव्याधी असलेले असे रुग्ण ज्यांच्यामध्ये कोणतीही लक्षणे आढळत नाहीत) केंद्र सरकारच्या मार्गदर्शक सुचनांनुसार तपासणी केल्यानंतर वैद्यकीय अधिकारी आणि नियमित कौटुंबिक चिकित्सक यांच्या एकत्रित सल्ल्याने क्वारंटाईन करता येऊ शकेल. अशा रुग्णांना वैद्यकीय तज्ज्ञांनी लक्षणे नसलेले बाधित (एसिम्प्टोमॅटिक) किंवा सौम्य लक्षणं असलेले बाधित म्हणून निर्देशित केलेले असणे आवश्यक असेल. अशा रुग्णांच्या घरी पुरेशा सुविधा असणे आवश्यक असेल.

तसेच घरी विलगीकरणात असा रुग्ण राहत असल्याबाबत नातेवाईक, शेजारी/गृहनिर्माण संस्थेतील पदाधिकारी व रहिवाशी, नियमित कौटुंबिक चिकित्सक आणि नजीकची हेल्थ पोस्ट यांना माहिती असणे आवश्यक असेल. संबंधित रुग्णाने पल्स ऑक्सिमीटर, डिजीटल थर्मोमीटर, फेस मास्क, हातमोजे, निर्जंतुकीकरण द्राव्य (सॅनिटायझर) इत्यादी साधने बाळगून त्यांचा योग्य उपयोग करणे आवश्यक आहे. होम क्वारंटाईन असलेल्या रुग्णांमध्ये लक्षणे वाढीस लागली, तर त्यांना त्वरेने रुग्णालयांमध्ये दाखल करण्याची कार्यवाही करावी. त्यासाठी उपचार करत असलेले वैद्यकीय अधिकारी, वैद्यकीय तज्ज्ञ यांनी निर्णय घ्यावा.

First Published on: April 1, 2021 10:15 PM
Exit mobile version