मुंबई महापालिकेत आता फेशियल बायेामेट्रीक हजेरी; स्पर्श करण्याची गरजच नाही

मुंबई महापालिकेत आता फेशियल बायेामेट्रीक हजेरी; स्पर्श करण्याची गरजच नाही

प्रातिनिधिक छायाचित्र

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मुंबई महापालिकेत बायोमेट्रीक हजेरी बंद करण्यात आल्याने पर्याय म्हणून आधार व्हेरिफाईड फेसियल हे हजेरीचे नवीन तंत्र अमलात आणले आहे. नायर रुग्णालयात यशस्वी प्रयोग झाल्यानंतर आता टप्प्याटप्प्याने विभाग कार्यालयांसह इतर कार्यालयांमध्ये ही प्रणाली अमलात आणली जाणार आहे. ज्यामुळे कर्मचाऱ्यांची आधार कार्डशी हजेरी लिंक करून स्पर्श न करता आपली हजेरी नोंदवता येणार आहे. कोरोनासारख्या आजाराची भीती लक्षात घेता महापालिकेने हा निर्णय घेतला असून यामुळे कर्मचाऱ्यांची अचुक आणि शंभर टक्के हजेरी ऑनटाईम नोंद होणार आहे.

कोरोनाचा आजार अधिक प्रमाण पसरु नये म्हणून सुरक्षेच्या उपाययोजना म्हणून मार्च महिन्यात मंत्रालयासह शासकीय कार्यालये तसेच महापालिकेसह निमशासकीय कार्यालयांमध्ये बायोमेट्रीक हजेरी प्रणाली बंद करण्यात आली होती.  बायोमेट्रीक हजेरी प्रणालीचा अवलंब करताना कोरोनाचा संभाव्य धोका असल्याने कर्मचारी हजेरी नोंदवहीवरच स्वाक्षरी करत आहेत. त्यामुळे यावर पर्याय म्हणून मुंबई महापालिकेने बायोमेट्रीक प्रणालीमध्ये उपस्थिती नोंदवण्यासाठी लिनक्स बेस्ड आधार व्हेरिफाइड फेसियल याचा अवलंब करण्याचा निर्णय घेतला आहे.

नायर रुग्णालयात या प्रणालीचा अवलंब प्रायोगिक तत्वावर  करण्यात आला आहे. नायर रुग्णालयातील सुमारे ३५०० कर्मचाऱ्यांनी आपली नोंदणी केली आहे. त्यानुसार त्यांची स्पर्श न करता मशिनसमोर उभे राहताच हजेरी नोंद होत आहे. त्यामुळे या यशस्वी प्रयोगानंतर आता महापालिकेच्या डि विभागात या मशिन्स बसवल्या जात आहेत. डि विभागात या प्रकारच्या ४० मशिन्स बसवल्या जात आहेत. डि विभागातील यशस्वी प्रयोगानंतर महापालिका मुख्यालयासह सर्व विभाग कार्यालय व इतर कार्यालयांमध्ये या मशिन्स बसवल्या जाणार आहेत.

कामगार संघटनांच्या पदाधिकाऱ्यांची कोरोनामुळे अशाप्रकारे बोट दाबून हजेरी नोंदवणे घातक असल्याची तक्रार करून पर्यायी व्यवस्था उभी करावी,अशी सूचना केली होती. त्यानुसार महापौर किशोरी पेडणेकर यांनी महापालिका आयुक्तांना निर्देश दिले. त्यानुसार आयुक्तांनी त्यानंतर प्रमुख अभियंता यांत्रिक आणि विद्युत विभागाला आदेश देत हजेरीची नवीन प्रणाली विकसित करण्यास सांगितले. त्यानुसार या विभागाने निविदा मागवून या प्रणालीचा अवलंब महापालिकेत करण्याचा निर्णय घेतला आहे. या प्रणालीमुळे हजेरी नोंदवणारी व्यक्ती ही  मोबाईलला आधार क्रमांक लिंक केलेली व्यक्ती आहे किंवा अन्य आहे याप्रमाणे प्रणाली त्याचा स्वीकार करते व हजेरी नोंदवते. सामान्य प्रशासन विभागाचे सह आयुक्त मिलिन सावंत यांनी मुंबई महापालिकेच्या नायर रुग्णालयात प्रायोगिक तत्वावर या प्रणालीचा अवलंब करण्यात आला आहे. त्याचा निष्कर्षही चांगला दिसून आलेला आहे. ज्यामध्ये कर्मचाऱ्यांची हजेरी ऑनटाईम एचआर विभागाकडे नोंद होईल. त्यामुळे आता इतर कार्यालयांमध्ये ही प्रणाली बसवण्याचा विचार केला जाईल, असे सांगितले.

First Published on: November 19, 2020 6:40 PM
Exit mobile version