पावसामुळे कामगारांचा बुडालेला १ जुलै पालिका ‘फुल्ल डे’ भरणार!

पावसामुळे कामगारांचा बुडालेला १ जुलै पालिका ‘फुल्ल डे’ भरणार!

मुंबई महानगरपालिका मुख्यालय

मुंबईत १ आणि २ जुलै रोजी कोसळलेल्या मुसळधार पावसामुळे मुंबईची लोकलसेवा कोलमडून पडली होती. त्या दिवशी महापालिकेचे अनेक कर्मचारी उशिराने कामावर हजर राहिले होते. २ जुलै रोजी शासनानेच सुट्टी जाहीर केली होती. त्यामुळे १ जुलै रोजी उशिरा कामावर आलेल्या कर्मचार्‍यांचा अर्ध्या दिवसाचा पगार कापला जाणार नाही. त्या अर्ध्या दिवसाची सवलत देत सुट्टी माफ करण्यात येणार आहे. याबरोबरच महापालिका मुख्यालय परिसरात मागील आठवड्यात इंटरनेट सेवा खंडित झाल्याने अनेक कर्मचार्‍यांच्या हजेरी नोंदवल्या गेलेल्या नाहीत. त्यांनाही महापालिकेच्या वतीने सवलत जाहीर होणार असल्याने कर्मचार्‍यांना या दिवसांच्या हजेरीची चिंता करण्याची आता गरज नाही. मुंबई महापालिकेतील सर्व कर्मचार्‍यांच्या बायोमेट्रिक हजेरी नोंदवल्या जात आहेत. त्यामुळे अचूक हजेरी नोंदवण्यासाठी कर्मचार्‍यांना वेळेत कार्यालय गाठण्याची कसरत करावी लागत आहे. बर्‍याचदा अचूक बायोमेट्रिक हजेरीची मोजणी न झाल्याने तसेच कर्मचार्‍यांच्या संबंधित विभागाने हजेरीची नोंद योग्य प्रकारे सिस्टीममध्ये न नोंदवल्यामुळे अनेक कर्मचार्‍यांचे पगार कापले गेले आहेत. त्यामुळे बायोमेट्रिक हजेरीची धास्ती कर्मचार्‍यांनी घेतली आहे.


हेही वाचा – मुंबई महानगर पालिका कर्मचाऱ्यांना १५,००० रुपयांचा बोनस!

कर्मचाऱ्यांना महापालिकेचा दिलासा

१ जुलै रोजी मुसळधार पाऊस पडून मुलुंड येथे रेल्वे ट्रॅकवर पाणी तुंबल्यामुळे मध्य रेल्वेची वाहतूक कोलमडली होती. त्यामुळे गाडीत अडकलेले प्रवासी उशिराने कामावर परतले. सकाळी नियोजित वेळेवर कामावर पोहोचण्यासाठी निघालेले असतानाही केवळ रेल्वे सेवा विस्कळीत झाल्यामुळे त्यांना कामावर पोहोचता आले नाही. त्यामुळे उशिराने पोहोचलेल्या अनेक कर्मचार्‍यांची अर्ध्या दिवसाची हजेरी नोंदवली गेली. त्यानंतर दुसर्‍या दिवशी महापालिकेने सुट्टी जाहीर केली. पावसामुळे रेल्वे सेवा विस्कळीत झाल्यामुळे जे कर्मचारी उशिराने कामावर पोहोचले त्यांचा अर्धा दिवस कापला जाणार नाही. ज्या कर्मचार्‍यांची उशिराने हजेरी नोंदवली गेली आहे, त्यांचा उशिराने नोंदवलेल्या हजेरीबाबत सवलत दिली जाणार असल्याची माहिती महापालिकेच्या वरिष्ठ अधिकार्‍यांनी दिली. महापालिका आयुक्त प्रविणसिंह परदेशी यांनीच तशी सूचना संबंधित विभागाला केल्याचे बोलले जात आहे.

नोंदवहीतली हजेरी ग्राह्य

८ आणि ९ जुलै रोजी महापालिकेतील इंटरनेट सेवा बंद झाली होती. त्यामुळे अनेक कर्मचार्‍यांनी नोंदवहीत हजेरी नोंदवली आहे. त्यांनाही सवलत देवून नोंदवहीतील हजेरीप्रमाणे त्यांची हजेरी ग्राह्य धरली जाणार आहे. आपत्कालीन परिस्थितीत जर कर्मचारी उशिराने कामावर पोहोचू शकला असेल, तर त्यावेळी त्यांना सवलत देण्याच्या सूचना आयुक्तांनी संबंधित विभागाला केल्याचे सांगितले जात आहे.

First Published on: July 12, 2019 9:30 PM
Exit mobile version