बाप्पांच्या मूर्तीला धक्का लागल्यास प्रशासन जबाबदार!

बाप्पांच्या मूर्तीला धक्का लागल्यास प्रशासन जबाबदार!

प्रातिनिधीक फोटो

मागील अकरा दिवसांपासून विराजमान झालेल्या श्री गणरायांना गुरुवारी निरोप देण्यात येणार आहे. बाप्पाला निरोप देण्यासाठी भक्तांकडून विसर्जन मिरवणुका काढण्यात येणार आहेत. परंतु बाप्पांच्या विसर्जन मार्गात मोठ्या प्रमाणात खड्डे असल्याने विरोधकांसह सत्ताधारी पक्षानेही प्रशासनाला फैलावर घेतले. वरवरच्या मलमपट्टीने खड्डे बुजवत लोकांची फसवणूक करणे बंद करावे, असे खडे बोल सुनावत विसर्जनावेळी बाप्पांच्या मूर्तीला खड्डयांमुळे धक्का पोहोचल्यास याला प्रशासन जबाबदार राहिल, असा इशाराही त्यांनी दिला. मात्र, गणेश मूर्तींचे विसर्जन निर्विघ्न पार पडण्यासाठी रस्ते विभागासह विभाग कार्यालयाचे सर्व कामगार रस्त्यावर उतरुन रात्रीपर्यंत सर्व खड्डे बुजवतील, असे आश्वासन प्रशासनाने महापालिका सभागृहात दिले.

गणेश मूर्तींचे विसर्जन कसे करायचे?

मागील बुधवारी मुसळधार पावसाने मुंबईतील अनेक भागांमध्ये पाणी तुंबले. समुद्राचे पाणी आता मुंबईत शिरु लागले असून या पाण्याचा निचराच होत नसल्याने यासाठी बांधलेले पंम्पिंग स्टेशन, मिठी नदीच्या सफाईसह नाल्यांच्या सफाईच योग्यप्रकारे झाली नसल्याचा आरोप केला. त्यामुळे यावर्षी एकाही नालेसफाईच्या कामांचे पैसे कंत्राटदारांना देवू नये, अशी मागणी करताना, मुंबईच्या रस्त्यांवर मोठ्या प्रमाणात खड्डे पडल्याने गणेश मूर्तींचे विसर्जन कसे करायचे? अशी चिंताच विरोधी पक्षनेते रवी राजा यांनी निवेदनाद्वारे महापालिका सर्वसाधारण सभेत केली. त्यामुळे सर्व रस्ते खड्डे मुक्त करण्यासाठी बांधकामांच्या निकषात बदल करावा, अशीही मागणी त्यांनी केली.

प्रस्ताव विना चर्चा मंजूर केले जातात

जर विकासकामांचे श्रेय उद्घाटन आणि भूमिपुजन करत सत्ताधारी पक्ष घेत असेल तर रस्त्यांवर तुंबणारे पाणी आणि खड्डे यांची जबाबदारीही प्रशासनाबरोबरच सत्ताधारी पक्षाने घ्यायला हवी, असेही खडे बोल रवी राजा यांनी सुनावले. खड्डे आणि तुंबलेले पाणी याबाबतची निवेदनं वारंवार करण्याची गरजच का भासते? असा सवाल करत राष्ट्रवादी काँग्रेसच्या महापालिका गटनेत्या राखी जाधव यांनी पूरक्षेत्र का वाढली? याचा अभ्यास करायला हवा. तर सपाचे रईस शेख यांनी प्रशासनावर आता अंकूश राहिलेला नसून जर सत्ताधारी पक्षाला आयुक्तांच्या विरोधात याचिका करावी लागते, तिथे काय म्हणावे? असा सवाल केला. एका बाजूला प्रशासनाच्या विरोधात जायचे आणि त्यांचेचे प्रस्ताव विना चर्चा मंजूर केले जातात, असा टोलाही मारला.

खड्डे बुजवण्यासाठी हॉटमिक्सचा वापर करा

सभागृहनेत्या विशाखा राऊत यांनी याचा जोरदार समाचार घेतला.मेट्रो रेल्वेमुळे किंवा तुळशी, विहार आणि पवई तलावातील विसर्ग होणार्‍या पाण्यामुळेच मिठी नदीला पूर येऊन पाणी तुंबले जात असल्याचे सांगितले. मुंबईत सहा ठिकाणी पाण्याचा उपसा करण्यासाठी पंम्पिंग स्टेशन बनवण्यात आले आहे. ही पंम्पिंग स्टेशन कार्यान्वित आहेत. परंतु या पंम्पिंग स्टेशनची देखभाल कंत्राटदारांकडे असून त्याठिकाणी महापालिकेचे अभियंते उपस्थित नसतात. त्यामुळे सर्व पंम्पिंग स्टेशनमध्ये महापालिकेचे अभियंते असायला हवे, अशी सूचना त्यांनी केली. तसेच सध्या खड्डे बुजवण्यासाठी वापरण्यात येणारे कोल्डमिक्स हे दुसर्‍याच दिवशी वाहून जात पुन्हा खड्डा पडला जातो. त्यामुळे खड्डे बुजवण्यासाठी हॉटमिक्सचा वापर करण्याची मागणी राऊत यांनी केली.

खड्डे बुजवण्याचे काम युध्दपातळीवर

मात्र, प्रशासनाच्यावतीने उत्तर देताना अतिरिक्त आयुक्त प्रविण दराडे यांनी खड्डे बुजवण्याचे काम युध्दपातळीवर सुरु असून रात्रभर सर्व कामगार रस्त्यांवर उभे राहून खड्डे बुजवतील, असे आश्वासन दिले. परंतु पावसाळा असल्यास कोल्डमिक्सचाच वापर केला जाईल, असे स्पष्ट केले. पाणी व हॉटमिक्स हे शत्रू असल्याने ते टिकत नाही. आतापर्यंत आलेल्या २७८९ तक्रारींपैकी २७३१तक्रारींनुसार खड्डे बुजवले आहेत.

बोलू न दिल्याने विरोधकांचा सभात्याग

यावर सभागृहनेत्या विशाखा राऊत यांनी प्रशासनाला चांगलेच फैलावर घेत, केवळ अतिरिक्त आयुक्त विजय सिंघल यांच्या हट्टामुळेच कोल्डमिक्सचा वापर केला जात असल्याचा आरोप केला. त्यानंतर स्थायी समिती अध्यक्ष यशवंत जाधव प्रशासनाला खडे बोल सुनावत खड्डयांमुळे गणेश विसर्जनात कुठलीही अडचण आल्यास त्याला प्रशासन जबाबदार असेल, असा इशारा दिला. त्यामुळे प्रशासनाचा निषेध करत जाधव यांनी सभा तहकूब करण्याचीच मागणी केली. त्यानुसार उपमहापौर हेमांगी वरळीकर यांनी सभागृहाचे कामकाज तहकूब केले. तत्पूर्वी विरोधकांनी बोलू न दिल्यामुळे सभात्याग केला होता.

First Published on: September 11, 2019 10:04 PM
Exit mobile version