मानखुर्दच्या नाल्यावर पूल बनणार!

मानखुर्दच्या नाल्यावर पूल बनणार!

मानखुर्दच्या नाल्यावर पूल बनणार!

अण्णा भाऊ साठे नगर आणि पीएमजीपी कॉलनी यांच्या दरम्यान असलेला ‘मानखुर्द चिल्ड्रेन एड’ नाल्यावरील अनधिकृत बांधकामांच्या विरोधात बुधवारी मुंबई महापालिकेच्या ‘एम पूर्व’ विभाग कार्यालयाने कारवाई केली. या बांधकामावर कारवाई केल्यामुळे येथील रहिवाशांना नाल्यावरून येण्या-जाण्यासाठी पूल बांधण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. पुलाआभावी स्थानिकांना नाल्यातून ये-जा करावी लागत असे. त्यामुळे अनेकदा पावसाळ्यात मुलांचा मृत्यू झाल्याचे प्रकार घडले आहेत.

पोलिसांच्या मदतीने कारवाई यशस्वी

अण्णा भाऊ साठे नगर (२) आणि पीएमजीपी कॉलनी दरम्यानच्या नाल्यावरील प्रस्तावित पादचारी पुलाच्या जागी असलेली अनधिकृत बांधकामे नुकतीच हटविण्यात आली आहेत. यामुळे आता या पुलाचे रखडलेले बांधकाम मार्गी लागणार आहे. ही कारवाई करण्यासाठी महापालिकेचे ५४ कामगार, कर्मचारी आणि अधिकारी सहभागी झाले होते. तसेच या कारवाईसाठी मुंबई पोलीस दलातील ३१ पोलीस कर्मचारी आणि अधिकारी यांचा ताफाही घटनास्थळी तैनात होता. पोलिसांच्या मदतीने यशस्वीपणे करण्यात आलेल्या या पाडकाम कारवाईत १ जेसीबी, १ पोकलेन, २ डंपर यासह इतर आवश्यक वाहने आणि साधनसामुग्रीचा वापरण्यात आल्याची माहिती ‘एम पूर्व’ विभागाचे सहाय्यक आयुक्त श्रीनिवास किलजे यांनी दिली आहे.

३५ मीटर लांबीचा पूल

या परिसरातील नागरिकांच्या सुविधेसाठी या नाल्यावर महापालिकेद्वारे सुमारे ३५ मीटर लांबीचा पादचारी पूल बांधण्याचे प्रस्तावित करण्यात आले आहे. मात्र, हा पूल ज्याठिकाणी बांधण्यात येणार आहे, त्याठिकाणी काही महिन्यांमध्ये कच्या स्वरुपाची ३५ अनधिकृत बांधकामे होती. त्यामुळे पादचारी पुलाचे बांधकाम रखडले होते. या अनधिकृत बांधकामांवर मुंबई पोलिसांच्या मदतीने कारवाई करण्यात आल्याने आता पादचारी पुलाचे बांधकाम मार्गी लागणार असल्याचा विश्वास किलजे यांनी व्यक्त केला.

First Published on: December 12, 2018 10:15 PM
Exit mobile version