धुक्यामुळे रेल्वेचे वेळापत्रक बदलणार

धुक्यामुळे रेल्वेचे वेळापत्रक बदलणार

धुक्यामुळे रेल्वेच्या वेळापत्रकात होणार बदल

थंडीत वाढ झाल्यामुळे मोठ्या प्रमाणात धुके पसरत आहे. कमी होणाऱ्या तापमानामुळे कसारा, कर्जत या ठिकाणी धुके पसरल्यामुळे अंधूक दिसत आहे. यामुळे लोकल फेऱ्यांचा लेटमार्क टाळण्यासाठी मध्य रेल्वेने पहाटेच्या वेळापत्रकात बदल करण्याचा निर्णय घेतला असून, याची अंमलबजावणी करण्यात येणार आहे. विशेष बाब म्हणजे हा निर्णय घेण्यापूर्वी प्रथमच मध्य रेल्वेने रेल्वे प्रवासी संघटनांना विचारात घेतले आहे.

बैठकीत घेण्यात आला निर्णय

धुक्यामुळे समोरचे दिसणे कठीण होते. यामुळे अपघात होण्याची देखील शक्यता असते. त्यामुळे लोकल सुरक्षित वेगाने चालवण्यात यावी याकरता रेल्वेच्या वेळापत्रकात बदल करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. याबाबत मध्य रेल्वे अधिकाऱ्यांनी सीएसएमटीस्थित विभागीय रेल्वे व्यवस्थापक कार्यालयात प्रवासी संघटनांची गुरुवारी बैठक घेण्यात आली. या बैठकीत खोपोली, कसारा, कर्जत स्थानकांतून सीएसएमटीकडे जाणाऱ्या लोकल पहाटेच्या वेळी १० ते १५ मिनिटे आधी सोडण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. हवामान विभागाशी समन्वय साधून येत्या काही दिवसांमध्ये कोणत्या लोकल फेऱ्या १५ मिनिटे आधी चालवण्यात येईल, याची सविस्तर माहिती प्रवाशांना देण्यात येईल. याबाबत सर्व स्थानकांमध्ये उध्दोषणेतून माहिती देण्यात येणार असल्याचे कल्याण – कसारा – कर्जत रेल्वे प्रवासी संघटनेचे अध्यक्ष राजेश घनघाव यांनी सांगितले आहे. या बैठकीला कर्जत रेल्वे प्रवासी संघटनेचे रेल्वे प्रवासी संघटनेचे केतन शहा यांच्यासह शहाड, खोपोली आणि टिटवाळा येथील प्रवासी संघटनांचे प्रतिनिधी उपस्थित होते.

लोकल थांबून एक्स्प्रेसला प्राधान्य नको

मध्य रेल्वेने आयोजित केलेल्या बैठकीत एक मुद्दा उपस्थित करण्यात आला आहे. एक्स्प्रेसला प्राधान्य देण्यासाठी लोकल थांबवली जाते यामुळे प्रवाशांचा खोळंबा होतो. त्यामुळे गर्दीच्या वेळेत लोकल रखडत ठेवून मेल – एक्स्प्रेसना प्राधान्य देऊ नये अशी मागणी यावेळी करण्यात आली आहे. सर्व रेल्वे प्रवासी संघटनांची आक्रमकता पाहून या मागणीबाबत सकारात्मक विचार करण्याचे आश्वासन रेल्वे अधिकाऱ्यांनी दिल्याची माहिती प्रवासी संघटनेचे राजेश घनघाव यांनी दिली आहे.

First Published on: December 14, 2018 9:26 AM
Exit mobile version