तब्बल ९७ दिवसानंतर मेगाब्लॉकची पुन्हा सुरुवात 

तब्बल ९७ दिवसानंतर मेगाब्लॉकची पुन्हा सुरुवात 

संग्रहित छायाचित्र

कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी २२ मार्चपासून मुंबई उपनगरीय लोकल सेवा पूर्णपणे बंद केली होती. मात्र आता राज्य सरकारच्या मागणीनुसार मुंबई शहरातील अत्यावश्यक सेवेतील कर्मचार्‍यांसाठी १५ जूनपासून मर्यादित लोकल सेवा सुरु करण्यात आली आहे. त्यामुळे आता रेल्वे मार्गाच्या  नियमित देखभालीसाठी मध्य रेल्वेकडून रविवारी मेगाब्लॉक  घेण्यात येणार आहे. तब्बल ९७ दिवसानंतर मध्य रेल्वेने हा पहिला मेगाब्लॉक घेण्याचा निर्णय घेतला आहे.

रविवारी मध्य रेल्वे घेणार मेगाब्लॉक

मध्य रेल्वेच्या मुख्य मार्गावरील अप व डाउन  जलद मार्गावर विद्याविहार – मुलुंड दरम्यान रविवारी सकाळी १०.३० ते दुपारी ३.३० पर्यंत मेगाब्लॉक  असणार आहे. यादरम्यान  सकाळी १०.१६ ते दुपारी २.१७ या वेळेत छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथून सुटणा-या डाउन जलद विशेष लोकल माटुंगा ते मुलुंड दरम्यान डाउन धिम्या  मार्गावर वळविण्यात येतील आणि निर्धारित थांब्यांवर  थांबतील त्यानंतर मुलुंड येथे डाउन जलद मार्गावर वळविण्यात येतील. तर  दुपारी १२.४१ ते दुपारी ३.२५ या वेळेत ठाणे येथून सुटणा-या जलद विशेष लोकल मुलुंड ते माटुंगा दरम्यान अप धिम्या मार्गावर वळविण्यात येऊन निर्धारित थांब्यांवर थांबविण्यात येतील आणि माटुंगा येथे अप जलद (फास्ट) मार्गावर लोकल सेवा  वळविण्यात येतील. या मेगाब्लॉकमुळे काही ठाणे व कल्याण लोकल रद्द केल्या जातील परंतु राज्य शासनाने निश्चित केलेल्या  अत्यावश्यक सेवेतील  कर्मचार्‍यांसाठी पुरेशा सेवा चालविण्यात येतील.

हार्बर मार्ग मेगाब्लॉक

मध्य रेल्वेच्या हार्बर, मार्गावरील  पनवेल ते  वाशी दरम्यान अप व डाउन  हार्बर मार्गावर सकाळी ११.०५ ते संध्याकाळी ४.०५ मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. या मेगा ब्लॉकमध्ये नेरूळ / बेलापूर-खारकोपर हार्बर लाइनचा समावेश आहे. हार्बर मार्गावर छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसवरून  सकाळी ९.४५ ते दुपारी ३.०० पर्यंत  पनवेलला जाणा-या डाउन हार्बर मार्गावरील सेवा उपलब्ध होणार नाहीत. तसेच पनवेल येथून छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबईकडे जाणारी हार्बर मार्गावरील सेवा सकाळी ११.१५ ते दुपारी ४.००  वाजेपर्यंत उपलब्ध होणार नाही. तसेच या ब्लॉक कालावधीत विशेष लोकल गाड्या छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई – मानखुर्द- छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई या विभागात धावतील.

१४ व्या रविवारी मेगाब्लॉक

मुंबईची उपनगरीय लोकल सेवा गेली अडीच महिन्यापासून  बंद होती.  त्यामुळे उपनगरीय रेल्वे मार्गावर मेगाब्लॉक घेण्यात आलेला नव्हता. मध्य रेल्वेने शेवटचा मेगाब्लॉक २२ मार्च २०२० ला घेतला होता. त्यानंतर  उपनगरीय रेल्वे मार्गावर १३ रविवारचे खंड पडले आहे. आता १४ व्या रविवारी पहिला मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. कारण राज्य सरकारच्या मागणीनुसार मुंबई शहरातील अत्यावश्यक सेवेतील कर्मचार्‍यांसाठी १५ जूनपासून मध्य आणि पश्चिम रेल्वे मार्गावर दिवसाला ३६२ फेर्‍या चालवण्यात येत आहेत. त्यामुळे उपनगरी रेल्वे मार्गावरील रुळांची  नियमित दुरुस्ती करण्यासाठी आता पहिला  मेगाब्लॉक मध्य रेल्वेने घेण्याचा निर्णय केला आहे. त्यामुळे रविवारी अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांना प्रवासादरम्यान अडचणी निर्माण होण्याची शक्यता आहे.

First Published on: June 27, 2020 5:07 PM
Exit mobile version