‘उज्जवल भविष्यासाठी, इंधनाचा काटकसरीने वापर करा’

‘उज्जवल भविष्यासाठी, इंधनाचा काटकसरीने वापर करा’

छगन भुजबळ

‘जनतेने उद्याच्या पिढीच्या उज्वल भविष्यासाठी इंधनाचा काटकसरीने वापर करुन पर्यावरण संवर्धनाच्या राष्ट्रीय मोहिमेत सहभागी होण्याचे आवाहन अन्न व नागरी पुरवठा आणि ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांनी केले. पेट्रोलियम पदार्थाच्या संरक्षणाबाबत जनजागृती करण्यासाठी पेट्रोलियम संवर्धन संशोधन संघटनेद्वारे (PCRA) आयोजित ‘सक्षम अभियान २०२०’ (संरक्षण क्षमता महोत्सव) कार्यक्रमाचे उद्‌घाटन भुजबळ यांच्या हस्ते यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान येथे झाले, त्यावेळी ते बोलत होते.

काय म्हणाले छगन भुजबळ

‘विकासाकडे वेगाने वाटचाल करणाऱ्या आपल्या देशाची आणि राज्याच्या ऊर्जेची वाढती गरज भागविण्यासाठी पेट्रोलियम पदार्थाच्या आयातीवर अवलंबून राहावे लागते. त्यामुळे अशा परिस्थितीत ऊर्जा साधनांचा काटकसरीने वापर करणे हे देशाच्या आणि राज्याच्या शाश्वत विकासासाठी, पर्यावरण संवर्धनासाठी महत्वाचे पाऊल ठरते. राज्य सरकार पेट्रोलियम पदार्थांना पर्याय म्हणून अपारंपरिक ऊर्जेचा आणि इतर साधनांचा वापर करण्यासाठी उपाययोजना करीत आहेत’. दरम्यान, ‘सक्षम अभियान २०२०’, ‘इंधन अधिक ना खपाएं, आओ पर्यावरण बचाए’ हे घोषवाक्य प्रत्यक्ष कृतीत आणण्यासाठी आपण सर्वांनी मिळून प्रयत्न करणे आवश्यक आहे. या अभियानांतर्गत होणाऱ्या विविध कार्यक्रमांचा यासाठी निश्चितच उपयोग होईल, असे देखील ते पुढे म्हणाले.

परिवहन संस्था पुरस्कार

दरम्यान, भुजबळ यांच्या हस्ते राष्ट्रीय स्तरावरील दुसरा उत्कृष्ट राज्य परिवहन संस्था पुरस्कार बेस्टचे मुख्य प्रबंधक लाड यांना देण्यात आला असून बेस्टच्या बांद्रा डेपोला उत्कृष्ट डेपो पुरस्कार देण्यात आला आहे. राज्यस्तरावरील उत्कृष्ट परिवहन पुरस्कार मुरुड (रायगड), पंचवटी (नाशिक), यवतमाळ, श्रीवर्धन (रायगड), पेण (रायगड), परभणी, पीएमपीएमएल पुणेच्या बालेवाडी या डेपोंना उत्कृष्ट डेपो पुरस्कार देण्यात आले आहेत. यावेळी अन्न व नागरी पुरवठा आणि ग्राहक संरक्षण विभागाचे प्रधान सचिव महेश पाठक, इंडियन ऑईल कॉर्पोरेशनचे प्रादेशिक समन्वयक सुजीत रॉय, हिंदुस्तान पेट्रोलियम कार्पोरेशन लि.चे पश्चिम विभागाच्या विक्री विभागाचे मुख्य व्यवस्थापक डी.एन.कृष्णमूर्ती, लिक्वीफाईड पेट्रोलियम गॅस कपंनीचे मुख्य व्यवस्थापक तपाश गुप्ता, पेट्रोलियम कर्न्झ्व्हेशन रिसर्च असोसिएशनचे पश्चिम विभागाचे संचालक देबाशिष चौधरी तसेच या क्षेत्रात काम करणारे स्वयंसेवी संस्थांचे प्रतिनिधी आणि विद्यार्थी देखील उपस्थित होते.


हेही वाचा – इंदिरा गांधी – करीम लाला भेटीचे वक्तव्य मागे; संजय राऊत यांची माघार


 

First Published on: January 16, 2020 3:33 PM
Exit mobile version