‘भारत सच्चाईच्या मार्गावर, पराजय दहशतवादाचाच’ – मुख्यमंत्री

‘भारत सच्चाईच्या मार्गावर, पराजय दहशतवादाचाच’ – मुख्यमंत्री

देवेंद्र फडणवीस

भारत सच्चाईच्या मार्गावर आहे. त्यामुळे अखेरीस विजय आपलाच होईल. दहशतवाद आणि दहशतवादी वृत्ती पराजित होईल, अशा शब्दांत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मुंबईवरील दहशतवादी हल्ल्याच्या स्मृती जागवितानाच हा हल्ला आता मानवतेवर, आंतरराष्ट्रीय समुदायावरील हल्ला मानला जात असल्याचे सांगितले. मुंबईवरील २६/११ दहशतवादी हल्ल्यास दहा वर्षे पूर्ण झाल्याच्या अनुषंगाने दि इंडियन एक्सप्रेस वृत्त समुहाच्यावतीने ‘२६/११ स्टोरीज् ऑफ स्ट्रेंग्थ’ या पुस्तकाचे प्रकाशन करण्यात आले. या कार्यक्रमात मुख्यमंत्री फडणवीस बोलत होते. गेट-वे-ऑफ इंडिया आणि हॉटेल ताज पॅलेस दरम्यानच्या मैदानात हा कार्यक्रम झाला. यावेळी केंद्रीय रेल्वे व कोळसा मंत्री पियूष गोयल, केंद्रीय गृह राज्यमंत्री हंसराज अहिर, खासदार पूनम महाजन, ज्येष्ठ अभिनेते अमिताभ बच्चन यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.

वाचा : एकात्मता ही राष्ट्रशक्ती; २६/११ च्या निमित्ताने बिग बींचे मत

भारताचा मार्ग सच्चाईचा

मुख्यमंत्री म्हणाले की, हा हल्ला मानवतेवरील, देशाच्या सार्वभौमतेवरील दहशतवादी हल्ला होता. त्यामध्ये भारताला, मुंबई आणि आंतरराष्ट्रीय समुदायाला पराजित करण्याचा कट होता. या हल्ल्याच्या स्मृती जागविण्यातून, त्या जखमांतून सावरण्याचा प्रयत्न आहे. खरंतर भारत आणि मुंबईने हल्ल्यात आणि त्यानंतरही मोठी दृढता दाखविली आहे. यातून प्रेरणा घेता येतील, अशा शौर्यगाथा पहावयास मिळाल्या आहेत. भारताने कुणावरही हल्ला केला नाही आणि दहशतवादाकडे लोटलेले नाही. भारताचा मार्ग सच्चाईचा आहे. अशा हल्ल्यांची पुनरावृत्ती होऊ नये, अशा प्रकारचे धडे घेतले आहेत. यातून ‘थर्ड आय’ सारखा प्रकल्प मुंबईत कार्यान्वित करण्यात आला आहे. मुंबई पोलीस, तटरक्षक दल, नौदल आणखी सतर्क आणि सुसज्ज झाले आहेत. सुरक्षा दलांत समन्वयन आणि माहितीचे आदानप्रदान वाढले आहे.

वाचा : २६/११:अतिरेक्यांनी मुस्लिमांना वाचवले, मेघालयाच्या राज्यपालांचे वादग्रस्त ट्विट

दहशतवादाच्या समुळ उच्चाटन

दहा वर्षानंतर आंतरराष्ट्रीय स्तरावरही दृष्टिकोन बदलला आहे, हा हल्ला आता मानवतेवरील, आंतरराष्ट्रीय समुदायावरील हल्ला मानला जात आहे. भारताची दहशतवादाच्या समुळ उच्चाटनाचे धोरणच अधोरेखित झाले असून त्यातून या वृत्तींना पराजित करण्यात यशस्वी होऊ. या हल्ल्यात हौतात्म्य पत्करलेल्या वीरांना अभिवादन करतानाच या वीरांचे तसेच बळींच्या धीरोदात्त कुटुंबियांच्या पाठिशी सदैव भक्कमपणे राहू, असेही फडणवीस यांनी आश्वस्त केले. केंद्रीय मंत्री गोयल यांनी दहशतवादाला कदापी सहन केले जाणार नाही, असे सांगतानाच आपली एकात्मताच दहशतवादाचे पारिपत्य करू शकेल, असे नमूद केले. कविता अय्यर यांनी या पुस्तकाचे संपादन केले आहे.

वाचा : २६/११ हल्ल्यातील शहिदांचा सरकारला विसर- अजित पवार

विविध कार्यक्रमाचे आयोजन

या निमित्ताने आयोजित कार्यक्रमात ज्येष्ठ गीतकार जावेद अख्तर, गायिका कौशिकी चक्रवर्ती, बासरीवादक राकेश चौरासिया, नृत्यांगना मयुरी आणि माधुरी उपाध्याय, पियानीस्ट मर्लीन डिसूझा, हर्षदिप कौर, गायिका निती मोहन, गायक राहूल देशपांडे आणि महेश काळे, जावेद अली, अनी ड्रोल्मा, गायक शिवम महादेवन आणि समूह आदींनी विविध कलाविष्कार सादर केले. अनंत गोयंका यांनी प्रास्ताविकात पुस्तकाबाबत माहिती दिली. अभिनेते बच्चन यांनी भाषणात ‘एकात्मता’ ही संकल्पना विशद केली.

वाचा : २६/११: संजय निरुपमांना शहिदांचा विसर; गजेंद्र सिंग यांना वगळले

पोलिस वाद्यवृंद आणि नौंदलाच्या वाद्यवृंदानेही या निमित्ताने शहिदांना मानवंदना देणाऱ्या तसेच औचित्यपूर्ण धून सादर केल्या. कार्यक्रमास दहशतवादी हल्ला परतवून लावण्यात हौतात्म्य पत्करलेल्या वीरांचे आणि सहभागी वीरांसह हल्ल्यात बळी पडलेल्यांचे कुटुंबीय तसेच सेना दलांचे, मुंबई पोलीस, अग्निशमन दलांचे अधिकारी आदी उपस्थित होते.

First Published on: November 26, 2018 10:06 PM
Exit mobile version