मुख्यमंत्री सहाय्यता निधी कक्ष बंदच

मुख्यमंत्री सहाय्यता निधी कक्ष बंदच

राज्यात राष्ट्रपती राजवट लागू झाल्याने मंत्रालयातील मुख्यमंत्री सहाय्यता निधी कक्ष गेल्या काही दिवसांपासून बंद पडला आहे. यामुळे राज्यातील हजारो रुग्णांना मदतीअभावी हाल झाल्याचे तक्रारी समोर आल्या होत्या. त्यामुळे याची गंभीर दखल या कक्षासाठी दोन अधिकार्‍यांच्या पदाची नेमणूक करण्याचा निर्णय झाला होता. मात्र अद्याप या पदांची नियुक्ती न झाल्याने मंत्रालयातील हे सहाय्यता निधी कक्षच बंदच असून यामुळे राज्यातील मदतीच्या प्रतीक्षेत असणार्‍या हजारो रुग्णांच्या पदरी निराशा पडली आहे.

राज्यात सुरू असलेला सत्तासंघर्ष लक्षात घेता कोणत्याही पक्षांनी सत्तास्थापनेचा दावा न केल्याने राज्यात ८ नोव्हेंबर रोजी राष्ट्रपती राजवट लागू करण्यात आली आहे. त्यामुळे राष्ट्रपती राजवट लागू झाल्यानंतर मंत्रालयातील अनेक कक्षांना त्याचा फटका बसला होता. त्यातील एक कक्ष म्हणजेच मुख्यमंत्री सहाय्यता निधी कक्षाला देखील याचा फटका बसला होता. त्यामुळे राज्यातील हजारो रुग्णांना मदत मिळाली नसल्याचे समोर आले होते.

या मदतीसाठी सोमवारी देखील राज्यातील कानाकोपर्‍यातील अनेक नागरिक मंत्रालयाच्या सहाव्या मजल्यावर पोहचले. मात्र सोमवारी ही हे कक्ष बंद असल्याने नागरिकांनी तीव्र शब्द नाराजी व्यक्त केली. त्यामुळे संतप्त नागरिकांनी सहाव्या मजल्यावरील मुख्य सचिवांच्या दालनाजवळ धाव घेतली. यावेळी या संतप्त नागरिकांनी आक्रमक पवित्रा लक्षात घेता याठिकाणी काही काळ तणावाचे वातावरण पसरले होते. त्यामुळे याप्रकरणी मुख्य सचिवांनी हस्तक्षेप करीत शुक्रवारपर्यत हे कक्ष सुरू होईल, असे आश्वासन दिले आहे. त्यानंतर या नागरिकांनी येथून काढता पाय घेतला खरा पण सोमवारी दिवसभर अनेकांनी या दालनाबाहेर फेर्‍या मारत मदतीसाठी चाचपणी केल्याचे वारंवार दिसून येत होते.

मुख्यमंत्री सहाय्यता निधीची उपयुक्तता
या कक्षाच्या माध्यमातून गेल्या साडेचार वर्षात ५६ हजारांहून अधिक रुग्णांना मुख्यमंत्री सहाय्यता निधीच्या माध्यमातून मदत करण्यात आली आहे. यामध्ये विविध आजारांनी ग्रस्त असलेल्या रूग्णांचा समावेश असून त्यांना एकूण साडेपाचशे कोटी रुपयांची मदत देण्यात आली आहे. तर २००९ ते २०१४ मध्ये सुमारे १६ हजार रूग्णांना ४० कोटी ५६ लाख ९४ हजार ७०० रूपये वितरित करण्यात आले होते. तर कर्करोगाच्या उपचारासाठी सर्वाधिक म्हणजे ८ हजार ४६८ रूग्णांना सुमारे ९० कोटी रूपयांची मदत देण्यात आली आहे.

First Published on: November 19, 2019 3:14 AM
Exit mobile version