भिवंडीतील बालविवाहाचा प्रयत्न पोलिसांनी रोखला

भिवंडीतील बालविवाहाचा प्रयत्न पोलिसांनी रोखला

बालविवाह

बालविवाहाला कायद्यााने बंदी असूनही अजूनही राजरोसपणे असे प्रकार घडत असल्याचे आढळून येत आहे. भिवंडीतील नारपोली भागातील विवाह मंडपात धाड टाकून पोलिसांनी त्या ठिकाणी सुरू असणारा बालविवाह रोखल्याची घटना शुक्रवारी सायंकाळी उघडकीस आली. विवाह सुरू होण्यापूर्वी दोन तास आधी बुलढाणा आणि नारपोली पोलिसांनी ही कारवाई केली आहे. पोलिसांनी अल्पवयीन मुलीसह तिच्या आई आणि भावास ताब्यात घेतले आहे. मात्र पोलीस कारवाईची चाहूल लागताच नवरदेवाने लग्न मंडपातून पळ काढला.

बुलढाण्यातील मिलिंदनगर भागात वास्तव्यास असणाऱ्या १३ वर्षीय मुलीचा विवाह मुंबईत होणार असल्याची माहिती बुलढाणा येथील तहसीलदारांना मिळाली होती. तहसिलदारांनी तात्काळ बुलढाण्यातील शहर पोलीस ठाण्यात पत्राद्वारे याबाबतची माहिती दिल्यांनतर बुलढाणा पोलिसांनी मुलीचा शोध घेण्यास सुरुवात केली. लग्न कधी आहे आणि कोणाबरोबर होणार आहे, याविषयी कोणतीही माहिती पोलिसांना नव्हती. मात्र बुलढाणा पोलिसांनी मुलीच्या आईच्या मोबाईल क्रमांकावरून त्यांचे ठिकाण शोधून काढले. पोलिसांना ते भिवंडीतील नारपोली येथे असल्याचे समजले. बुलढाणा पोलिसांनी ही माहिती नारपोली पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक एम. बी. शिंदे यांना दिल्यांनतर नारपोली पोलिसांनी तात्काळ चौकशी सुरू केली. भिवंडीतील कालवार येथील २४ वर्षीय युवकासोबत मुलीचा विवाह होणार होता.

हा मुलगा चालक असून शुक्रवारी सायंकाळी ६ वाजता येथील साठेनगरमध्ये लग्न असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. मात्र लग्नाच्या दोन तास आधी चार वाजता पोलीस घटनास्थळी पोहचले आणि मुलीला ताब्यात घेऊन या अल्पवयीन मुलीचा विवाह रोखला असल्याची माहिती वरिष्ठ पोलिस निरीक्षक शिंदे यांनी दिली. नारपोली येथे मुलीची आत्या राहत असून या कारवाईनंतर मुलगा विवाहाच्या ठिकाणी आलाच नाही, असेही शिंदे यांनी सांगितले. याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला नाही.

अल्पवयीन मुलीच्या वडिलांचे निधन झाले असून आई कामाला जाऊन कुटुंबाचा उदरनिर्वाह करत असल्याचे नारपोली पोलिसांनी सांगितले. भिवंडीत दाखल झालेल्या बुलढाणा शहर पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक डी. बी. वाघमोडे यांच्या पथकाने मुलीसह तिच्या आईला ताब्यात घेतले असून मुलीला बालकल्याण समितीकडे हजर केले जाईल, असे पोलिसांनी सांगितले. बुलढाणा पोलीस शनिवारी मुलगी आणि तिच्या आईला सोबत घेऊन बुलढाण्याला रवाना झाले आहेत. नवरदेव हा मुळचा बुलढाण्याचा असल्याची माहिती पोलिसांनी दिली.

First Published on: May 19, 2019 11:07 AM
Exit mobile version