घरकाम करणाऱ्या असंघटीत हजारो महिलांनी कशी गुजराण करायची? भाजपचा सवाल

घरकाम करणाऱ्या असंघटीत हजारो महिलांनी कशी गुजराण करायची? भाजपचा सवाल

कोरोनाच्या दुसऱ्या लाटेला थोपवण्यासाठी राज्य सरकारने कडक निर्बंध लागू केले आहेत. हे नियम आज रात्री ८ वाजल्यापासून लागू होणार आहेत. यामध्ये मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी अनेक महत्त्वाचे मुद्दे मांडले. त्यात गोरगरीब लोकांना अन्न धान्याचे वाटप करण्यात आले. तर फेरीवाल्यांना देखील आर्थिक मदत करण्यात आली आहे. त्याचप्रमाणे निवृत्तीवेतन योजना लाभार्थींना देखील आर्थिक सहाय्य देण्यात आले आहे. मात्र, यावर भाजप नेत्या यांनी प्रश्न उपस्थित केला आहे. ‘जर सरकारने केवळ संघटित वर्गाला मदत करण्याची घोषणा केली आहे. मात्र, असंघटित घरकाम करणाऱ्या महिलांची संख्या हजारोंच्या घरात आहे. मात्र, त्यांच्याबाबत मुख्यमंत्र्यांनी कोणताही निर्णय घेतलेला नाही. त्यामुळे बाकीच्यांनी त्यांची गुजराण कशी करावी?’, असा प्रश्न भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी मुख्यमंत्र्यांना विचारला आहे.

काय म्हणाल्या चित्रा वाघ?

‘मुळात असंघटित घरकाम करणाऱ्यांची संख्या हजारोंच्या घरात आहे. मात्र, तरी देखील त्यांना मदत न करता केवळ संघटित वर्गातील लोकांना मदत करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. त्यामुळे बाकिच्यांनी काय करावे’?, असा संतप्त सवाल चित्रा वाघ यांनी ट्विटरद्वारे मुख्यमंत्र्यांना विचारला आहे.

फेरीवाल्यांना आर्थिक सहाय्य

राज्यातील सुमारे पाच लाख फेरीवाल्यांना प्रत्येकी पंधराशे रुपयांचे आर्थिक सहाय्य देण्यात आले आहे. ही रक्कम थेट फेरीवाल्यांच्या बँक खात्यात जमा करण्यात येणार आहे. तर नोंदणीकृत बांधकाम कामगार कल्याण योजनेंतर्गत महाराष्ट्र इमारत आणि इतर कामगार कल्याणकारी मंडळाच्या निधीमधून राज्यातील नोंदणीकृत अशा सुमारे १२ लाख बांधकाम कामगारांना प्रत्येकी पंधराशे रुपयांचे अनुदान देण्यात येणार आहे. याशिवाय राज्यातील २५ लाख घरेलू कामगारांसाठी विविध कल्याणकारी सहाय्यासाठी भरीव निधीची तरतूद करण्यात आली आहे.

निवृत्तीवेतन योजना लाभार्थींना आर्थिक सहाय्य

या विभागाच्या संजय गांधी निराधार योजना, श्रावणबाळ आणि केंद्र पुरस्कृत इंदिरा गांधी राष्ट्रीय वृद्धापकाळ निवृत्ती वेतन योजना, इंदिरा गांधी राष्ट्रीय विधवा निवृत्ती वेतन, इंदिरा गांधी राष्ट्रीय दिव्यांग निवृत्ती वेतन योजना, अशा या पाच योजनेतील सुमारे ३५ लाख लाभार्थ्यांना दोन महिन्यांकरिता प्रत्येकी एक हजार रुपयांचे आर्थिक सहाय्य आगाऊ देण्यात येणार आहे. त्यामुळे असंघटित वर्गाने काय करावे, असा प्रश्न आता विरोधकांकडून उपस्थित होत आहे.


हेही वाचा – लाभार्थ्यांची यादी कुठे आहे?, काँग्रेस नेत्याचा मुख्यमंत्र्यांना सवाल


 

First Published on: April 14, 2021 4:22 PM
Exit mobile version