सिव्हील हॉस्पिटलचा अतिदक्षता विभागच धोकादायक स्थितीत

सिव्हील हॉस्पिटलचा अतिदक्षता विभागच धोकादायक स्थितीत

पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी आरोग्यमंत्री झाल्यावर ठाण्यातील जिल्हा शासकीय रुग्णालय म्हणजेच सिव्हील हॉस्पिटल आता अधिक सुसज्ज करण्याची घोषणा केली होती. मात्र त्यानंतर याबाबत काही हालचाल झालेली नाही. हॉस्पिटल परिसरात अस्वच्छता आहे. त्यातच लटकलेल्या विजेच्या तारांमुळे अपघाताचा धोका आहे.

हॉस्पिटलच्या अतिदक्षता विभागातील उघड्या विद्युत डिपींमुळे अपघाताचा धोका आहे. ही स्थिती अमलगस फॅसिलीटी सर्व्हीस सेंटरचे अक्षय कोळी यांनी हॉस्पीटलमधील कर्मचार्‍यांच्या निदर्शनास आणली. कोळी यांच्या संस्थेच्या माध्यमातून त्यांनी सिव्हील रुग्णालयातील स्वच्छता मोहिम राबविली त्यावेळी हा प्रकार त्यांच्या निदर्शनास आला.

सिव्हील हॉस्पिटलमधील अतिदक्षता विभागात ‘अति दक्षता विभाग’ फलक लिहिलेल्या ठिकाणीच विजेच्या डिपी उघड्या आहेत. तर त्याच्या अवतीभोवती लटकलेल्या विद्युत तारांना एखाद्या रुग्णाचा हात लागल्यास जिवीतहानी होण्याची भीती व्यक्त केली जात आहे. एवढेच नव्हे तर अतिदक्षता विभागातील इमारतीच्या आजूबाजूच्या खिडक्यांमध्येही विद्युत तारा लटकताना दिसत आहेत.

First Published on: November 15, 2019 1:38 AM
Exit mobile version