मुंबईकरांना व्हायरल ‘फिवर’चा ताप; वातावरण बदलामुळे वाढले व्हायरल तापाचे प्रमाण

मुंबईकरांना व्हायरल ‘फिवर’चा ताप; वातावरण बदलामुळे वाढले व्हायरल तापाचे प्रमाण

मुंबईत सध्या पावसाचा जोर कायम असून याचा परिणाम मुंबईकरांच्या जनजीवनावर होत आहे. उन्हाळा असो पावसाळा असो किंवा मग हिवाळा या तिन्ही ऋतूंमध्ये शरीराची रोगप्रतिकारशक्ती कमी झाल्यामुळे मुंबईकर लगेच आजारी पडायला लागले आहेत. सध्या मुंबईकर व्हायरल फिवरने त्रस्त झाले आहेत. वातावरण बदलामुळे व्हायरल तापाच्या रुग्णांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ होत आहे. पावसाळ्यात साथीच्या आजारांचं प्रमाण वाढत असल्यामुळे त्यावर उपचार करण्यासाठी
पालिकेच्या सर्व प्रमुख हॉस्पिटलमध्ये विशेष ओपीडी सुरू करण्यात आली आहे. या ओपीडीत सर्व प्रकारच्या साथीच्या आजारांवर उपचार केले जात आहेत. सध्या या ओपीडीत रुग्णांची गर्दी गेल्या अनेक दिवसांपासून वाढलेली दिसते.


हेही वाचा – पावसाळ्यात फंगल इन्फेक्शन्स टाळण्यासाठी तयार रहा!


पहिल्या सोमवारच्या ओपीडीत १२४ रुग्णांची नोंद

केईएम या पालिकेच्या प्रमुख हॉस्पिटलच्या ओपीडीत दररोज १०० च्या वर रुग्ण दाखल होत आहेत. ज्यात सर्वात जास्त साध्या तापाचे रुग्ण येत आहेत. आठवड्याच्या पहिल्या सोमवारच्या ओपीडीत एकूण १२४ रुग्णांची नोंद करण्यात आली आहे. त्यापैकी व्हायरल तापाचे ११० रुग्ण होते. तर, उर्वरित १४ रुग्ण हे डायरिया, मलेरिया, लेप्टो आणि डेंग्यूचे होते. तर, रविवारच्या ओपीडीत एकूण १५२ रुग्ण दाखल झाले होते. त्यात साध्या तापाचे १२८ रुग्ण होते. गॅस्ट्रोच्या १०, डेंग्यूच्या १० आणि इतर आजारांनी ग्रस्त असलेल्या रुग्णांची नोंद करण्यात आली आहे.‌ त्यामुळे, सध्या पावसासोबत व्हायरल फिवरचाही वाढता जोर पाहायला मिळत आहे.

गेल्या काही दिवसांमध्ये ओपीडीत व्हायरल फिवरचे रुग्ण वाढले आहेत. सर्दी, खोकल्यानंतर ताप आलेल्या रुग्णांमध्ये वाढ झाली आहे. दररोज १०० च्या वर नवीन रुग्ण येत आहेत. तर, २५ जणांना आतापर्यंत अॅडमिट करुन घेण्यात आलं आहे. त्यांची तपासणी करून उपचार केले जात आहेत.  डॉ. मिलिंद नाडकर, विशेष फिवर ओपीडी विभागाचे प्रमुख

व्हायरल संसर्गापासून वाचण्यासाठी काय कराल

पावसाच्या साचलेल्या पाण्यातून जास्त चालू नये.

पाणी उकळून प्यावे.

घरात आणि घराबाहेर स्वच्छता ठेवावी.

डासांची पैदास होऊ नये यासाठी पाण्याच्या टाक्यांवर झाकण ठेवावं.

काय टाळावं?

अनेक रुग्ण तापाकडे दुर्लक्ष करतात. औषध विक्रेत्यांकडून एखादं औषध विकत घेऊन झटपट बरं होण्याचा विचार करतात. परंतु, असं करणं जीवावर बेतू शकतं. याशिवाय योग्य ती काळजी न घेतल्यास साथीचा प्रसार होऊ शकतो, असे न करता तापात डॉक्टरांचा सल्ला घेणे गरजेचे आहे.

काय करावं?

छाती आणि पाठ गरम पाण्यात कापडं भिजवून दिवसातून किमान एकदोन वेळा शेकून घ्यावं.
बाहेरून आल्यावर हातपाय स्वच्छ धुवावेत.
ताप आल्यास डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.

तापाची लक्षणं

अंग दुखी, घसा खवखवणे, डोळयातून पाणी येणे, सर्दी होणे, अंतर्गत ताप जाणवणं, थकल्यासारखं वाटणं, कणकण भासणं, सांधे दुखी, मळमळणं, डोकेदुखी


हेही वाचा – पावसाळ्यात हाडांच्या समस्या कशा हाताळाव्या


 

First Published on: July 31, 2019 11:27 AM
Exit mobile version