…तर काँग्रेस नेत्यालाच बालाकोटच्या रॉकेटबरोबर पाठवले असते – मुख्यमंत्री

…तर काँग्रेस नेत्यालाच बालाकोटच्या रॉकेटबरोबर पाठवले असते – मुख्यमंत्री

महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

आजची निवडणूक ही खासदारकीची निवडणूक नसून, राष्ट्रीय अस्मितेची निवडणूक आहे. बालाकोटमध्ये घुसून अतिरेक्यांना मारून टाकण्यात आले. काँग्रेस नेते त्याचे पुरावे मागत आहेत. मात्र हे अगोदर माहित असतं तर बालकोटला जे रॉकेट पाठवले, त्याच्या बरोबर तुमच्या एका नेत्याला पाठवले असते, अशी घणाघाती टीका मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कल्याणमधील महायुतीच्या सभेत काँग्रेसवर केली.

कल्याणमध्ये प्रचार सभा 

भिवंडीचे महायुतीचे उमेदवार कपिल पाटील यांच्या प्रचारार्थ कल्याणातील फडके मैदानावर विजय संकल्प सभेचे आयोजन करण्यात आलं होतं. याप्रसंगी केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले, माजी मंत्री जगन्नाथ पाटील, महापौर विनिता राणे, आमदार किसन कथोरे नरेंद्र पवार, कुणबी सेनेचे विषवनाथ पाटील आदी पदाधिकारी उपस्थित होते.

अखेर राहुल यांनी माफी मागितली 

यावेळी बोलताना मुख्यमंत्री म्हणाले की, काँग्रेस राष्ट्रवादीला लाज पण वाटत नाही. ५० वर्षानंतर पण गरिबी हटली नाही. आता काय खाऊन गरिबी हटवणार?, असा सवाल मुख्यमंत्र्यांनी केला. गरिबांना ७२ हजार कुठून देणार यांच्याकडे उत्तर नाही. एकीकडे पारदर्शकता प्रामाणिकपणे मोदीजी काम करत होते आणि दुसरीकडे राहुल गांधी ‘चौकीदार चोर है’ म्हणत होते. मात्र आज सुप्रीम कोर्टात शपथपत्र दाखल करून त्यांनी माफी मागितली. देश चालवायला ५६ पक्ष नाही तर ५६ इंचाची छाती लागते. जी मोदींकडे आहे. मोगलांना पाण्यात संताजी-धनाजी दिसायचे तशी अवस्था काँग्रेस राष्ट्रवादीच्या नेत्यांची झाली असून त्यांना रात्रीही मोदी दिसत आहेत, असेही मुझ्यामंत्री म्हणाले. केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी आपल्या नेहमीच्या शैलीत कविता करत उपस्थितांची मने जिंकली. रिपाई महायुतीच्या उमेदवराच्या पाठीशी असल्याचे सांगितले.

First Published on: April 22, 2019 9:38 PM
Exit mobile version