मराठी भाषा दिनासाठी फक्त मुख्यमंत्रीच वेळेवर हजर, मंत्री-विरोधी पक्षनेते लेट!

मराठी भाषा दिनासाठी फक्त मुख्यमंत्रीच वेळेवर हजर, मंत्री-विरोधी पक्षनेते लेट!

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

२७ फेब्रुवारी या मराठी भाषा दिनी विधानभवनात सकाळी संस्कृतिक आणि इतर कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं होतं. त्यासंदर्भात आधीच सर्व कार्यक्रम ठरवण्यात आला होता. मात्र, तरीदेखील कार्यक्रमासाठी मंत्रीमंडळातील मंत्री किंवा विरोधी पक्षनेते वेळेवर पोहोचू शकले नाहीत. विशेष म्हणजे, खुद्द मुख्यमंत्री उद्धव ठाकरे बरोबर वेळेवर १० वाजून ३० मिनिटांनी कार्यक्रमासाठी विधानभवनात दाखल झाले होते. मात्र, काही मंत्र्यांचा आणि विरोधी पक्षनेत्यांचा पत्ता नव्हता. या पार्श्वभूमीवर किमान १० मिनिटांसाठी मुख्यमंत्र्यांना विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, प्रवीण दरेकर आणि इतर काही मंत्र्यांसाठी थांबावं लागल्याचा प्रकार आज घडला. याबद्दल माजी मंत्री दिवाकर रावते यांनी नाराजी व्यक्त केली आहे.

मुख्यमंत्री तयार असूनही जाऊ शकले नाहीत!

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे विधानभवनात उपस्थित झाल्यानंतर त्यांनी सेंट्रल हॉलमध्ये आयोजित करण्यासाठी जाणं अपेक्षित होतं. विधानभवनाच्या आवारातले कार्यक्रम आणि सादरीकरण पाहिल्यानंतर मुख्यमंत्री सेंट्रल हॉलमध्ये जाण्यासाठी देखील तयार झाले. मात्र, तोपर्यंत इतर काही मंत्री आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, प्रवीण दरेकर आले नव्हते. ते आल्याशिवाय मुख्यमंत्र्यांनी सेंट्रल हॉलमध्ये जाणं हे शिष्टाचाराला धरून झालं नसतं. त्यामुळे मुख्यमंत्र्यांना वाट पाहत ताटकळत थांबावं लागलं.

दिवाकर रावतेंची नाराजी

दरम्यान, या प्रकारावरून शिवसेना आमदार आणि माजी मंत्री दिवाकर रावते यांचा मात्र पारा चढला. आपली नाराजी त्यांनी विधानपरिषदेच्या उपसभापती नीलम गोऱ्हे यांच्याकडे बोलून देखील दाखवली. ‘आम्ही मंत्री असताना असं कधीही घडलं नाही. मुख्यमंत्र्यांना इतर मंत्र्यांची वाट पाहात ताटकळत उभं राहावं लागतंय’, अशा शब्दांत त्यांनी नाराजी व्यक्त केली. या सगळ्या प्रकारामुळे मराठी भाषा दिनाचा कार्यक्रम सुरू व्हायलादेखील उशीर झाला. अखेर इतर मंत्री आणि विरोधीपक्षनेते आल्यानंतर कार्यक्रमाला सुरुवात झाली.

First Published on: February 27, 2020 11:59 AM
Exit mobile version