हर्षवर्धन पाटलांनी निर्णय लोकसभेआधी घेतला असता, तर… – चंद्रकांत पाटील

हर्षवर्धन पाटलांनी निर्णय लोकसभेआधी घेतला असता, तर… – चंद्रकांत पाटील

भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील

पक्षांतर्गत वादाला कंटाळून अखेर काँग्रेसचे नेते आणि माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांनी काँग्रेसला सोडचिठ्ठी देत भाजपमध्ये प्रवेश केला आहे. मुंबईत झालेल्या जाहीर कार्यक्रमामध्ये त्यांनी जाहीर कार्यक्रमामध्ये भाजपमध्ये प्रवेश केला. यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील आणि मुंबई अध्यक्ष मंगलप्रभात लोढा उपस्थित होते. यावेळी चंद्रकांत पाटील यांनी हर्षवर्धन पाटलांचं स्वागत करतानाच ‘जर लोकसभेच्या २ दिवस आधी जरी त्यांनी भाजप प्रवेशाचा निर्णय घेतला असता, तर चित्र वेगळं असतं’, असा टोला लगावताच उपस्थितांमध्ये हशा पिकला.

बारामतीमध्ये हर्षवर्धन पाटील आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते यांच्यातलं वैर आणि सख्य सर्वश्रुत आहे. त्यातच लोकसभेला सुप्रिया सुळे यांचा प्रचार करण्याच्या बदल्यात विधानसभेला इंदापूरमधून उमेदवारी मिळणार असं ठरलेलं असताना देखील विधानसभेला उमेदवारी न सोडल्यामुळे नाराज झालेल्या हर्षवर्धन पाटील यांनी अखेर भाजपमध्ये जाण्याचा निर्णय घेतला. या पार्श्वभूमीवर बोलताना चंद्रकांत पाटील म्हणाले, ‘ज्यांचं कुणाशीच भांडण नाही आणि ज्यांच्याबद्दल कुणालाच द्वेष नाही, असे हर्षवर्धन पाटील भाजपमध्ये आल्यामुळे आधीच सशक्त असलेल्या भाजपला अधिकच बळ मिळालं. मात्र, जर हर्षवर्धन पाटील लोकसभा निवडणुकांच्या २ दिवस आधी जरी भाजपमध्ये आले असते, तरी बारामतीमध्ये इतरांची सुट्टीच झाली असती’, असा टोला पाटील यांनी लगावला.

‘अजून खूप जणांचे प्रवेश बाकी’

दरम्यान, यावेळी बोलताना चंद्रकांत पाटील यांनी ‘अजूनही खूप जणांचे प्रवेश बाकी आहेत’, असं सांगत ‘आधी आम्ही अब की बार २२० पार म्हणायचो. पण आता तो आकडा देखील मागे पडला आहे’, असं म्हणत अजून देखील पक्षप्रवेश होणार असल्याचं सांगितलं.

First Published on: September 11, 2019 4:04 PM
Exit mobile version