काँग्रेसकडून चक्क सावरकरांच्या देशभक्तीचे कौतुक

काँग्रेसकडून चक्क सावरकरांच्या देशभक्तीचे कौतुक

तुम्ही कधी काँग्रेसच्या नेऱ्यांकडून स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या देशभक्तीचे कौतुक ऐकलं का? कदाचित फार कमीच किंवा जवळपास नाहीच. मात्र, आज महाराष्ट्राच्या विधानभवनात चक्क काँग्रेसच्या आमदाराने सावरकरांचे कौतुक केले. काँग्रेसचे गटनेते शरद रणपिसे यांनी विधानपरिषदेत सावरकर यांच्या देशभक्तीचे कौतुक करत सावरकरांच्या देशभक्तीची तुलना थेट अटलबिहारी वाजपेयी यांच्या देशभक्तीशी केली. सावरकरांची देशभक्ती वाजपेयींच्या देशभक्तीसारखी कशी आहे, हे दाखवून देण्यासाठी त्यांनी सभागृहात अनेक दाखले दिले. मध्यंतरी काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी सावरकरांना ‘माफीवीर’ म्हणत त्यांच्यावर टीका केली होती. एकीकडे खुद्द राहुल गांधी सावरकरांवर टीका करत असताना रणपिसे यांनी आज सावरकरांचे कौतुक केले. विशेष म्हणजे रणपिसे यांनी वाजपेयी आणि सावरकर यांच्या देशभक्तीतील साधर्म्य सांगण्यासाठी त्यांच्या कविताही यावेळी सादर केल्या. अटलबिहारी वाजपेयी यांच्या निधनावरील शोक प्रस्ताव सभागृह नेते चंद्रकांत पाटील यांनी मांडला. त्यावर काँग्रेसकडून बोलताना गटनेते शरद रणपिसे म्हणाले, की सावरकरांनी आपल्या कवितेतून ‘ने मजसी ने मातृभूमीला….’ अशी कविता करून देशभक्ती प्रकट केली. त्याचप्रमाणे वाजपेयी यांनीही आपल्या ‘यह अर्पण की भूमी है…’ या कवितेतून केली आहे.

शिवसेनेकडून मात्र स्वागत

दरम्यान, शरद रणपिसे यांच्या वक्तव्याचे शिवसेनेकडून स्वागत करण्यात आले. ‘एका प्रखर हिंदुत्ववादी असलेल्या सावरकर यांचा उल्लेख आणि त्यांच्या देशभक्तीचे कौतुक केल्याने आम्ही त्यांचे स्वागत करतो’, असे शिवसेनेचे नेते व परिवहन मंत्री दिवाकर रावते म्हणाले. रणपिसे हे पुणेकर असल्याचे दाखवून दिले असल्याचेही रावते यावेळी म्हणाले. आज विधीमंडळ हिवाळी अधिवेशनाचा पहिला दिवस होता. यावेळी माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी, काॅम्रेड माधवराव गायकवाड, उमेशा शंकर पवार यांच्या निधनाबद्दल शोक प्रस्ताव मांडण्यात आला.


वाचा: ‘आम्हालाही जल्लोषाची तारीख सांगा’; MIM ची मागणी

First Published on: November 19, 2018 7:52 PM
Exit mobile version