…तर नरेंद्र मोदींना काळ्या पाण्याची शिक्षा द्यावी लागेल – सचिन सावंत

…तर नरेंद्र मोदींना काळ्या पाण्याची शिक्षा द्यावी लागेल – सचिन सावंत

पंतप्रधान नरेंद्र मोदी

सुशीलकुमार शिंदे यांच्याकडून माफीची अपेक्षा करणाऱ्या भाजपच्या विनोद तावडे यांनी आधी नोटाबंदीमुळे जनतेला झालेल्या त्रासाबद्दल नरेंद्र मोदी यांना कोणत्या चौकात शिक्षा द्यायची त्याचे उत्तर द्यावे, जनता वाट पहात आहे. पन्नास दिवस द्या, त्यानंतर जनता सांगेल ती शिक्षा भोगायला तयार असल्याचे मोदी म्हणाले होते. तसेच पाच वर्ष खोटं बोलून जनतेची फसवणूक केली, त्याबद्दल तर मोदी यांना काळ्या पाण्याचीच शिक्षा द्यावी लागेल, असे महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस, प्रवक्ते सचिन सावंत म्हणाले. माजी मुख्यमंत्री सुशीलकुमार शिंदे आणि अशोक चव्हाण यांच्यावर केलेल्या टीकेला सावंत उत्तर देत होते.

नांदेडमध्ये भाजपचं पाणीपत

चव्हाण आणि शिंदे भावनिक आवाहन करत मतं मागत आहेत. विकासकामं केली असती तर त्यांच्यावर अशी वेळ आली नसती, असा आरोपही तावडे यांनी केला आहे. विकास कामं केली नसती तर नांदेड महानगरपालिका निवडणुकीत जनतेने काँग्रेसला भरभरून मतं दिली नसती. भाजपने सर्वशक्ती लावूनही नांदेडमध्ये त्यांचे काय झाले हे कदाचित तावडेंना आठवत नसेल, असा टोलाही त्यांनी लगावला.

विकासकामांवरून जाब विचारला 

महाराष्ट्राच्या मंत्रीमंडळात सोलापूरचे दोन मंत्री भारतीय जनता पक्षाचे आहेत. महानगरपालिकेवरही भाजपची सत्ता आहे. तरीही शहराला पाच दिवसाआड पाणी पुरवठा का होतो? स्मार्ट सिटीअंतर्गत सोलापुरचा काय विकास केला, हेही तावडेंनी सांगावे. सुशीलकुमार शिंदे यांनी काय विकास केला हे सोलापूरच्या जनतेला माहित आहे. भाजपसारखी जुमलेबाजी काँग्रेसने केलेली नाही. पराभव दिसू लागल्यामुळे भाजपचे नेते सैरभैर झाले आहेत. त्यातूनच विरोधकांवर बिनबुडाचे आरोप केले जात आहेत, असेही सावंत म्हणाले.

First Published on: April 17, 2019 5:53 PM
Exit mobile version