कोरोना मृत्यूचा भार विद्युत दाहिन्यांवर,भविष्यात दाहिन्या बंद पडण्याचा धोका!

कोरोना मृत्यूचा भार विद्युत दाहिन्यांवर,भविष्यात दाहिन्या बंद पडण्याचा धोका!

मुंबईत सध्या कोरोना बाधित रुग्णांचा मृत्यू झाल्यास त्यांच्यावर विद्युत दाहिनीवर अंत्यसंस्कार करण्यात येत आहे. परंतु मुंबईत केवळ  ११ विद्युत दाहिनी असून यासर्वांवर कोविड बाधित रुग्णांवरील अंत्यसंस्कारामुळे भार वाढू लागला आहे. त्यामुळे  कोविडच्या आजारापूर्वी अपवादात्मक मृतदेहावंरच विद्युत दाहिनींवर अंतिम संस्कार होत असत. परंतु आता  यासाठी २४  तास विद्युत दाहिनी सुरु असल्याने त्यात तांत्रिक बिघाड होत ते बंद पडत असल्याचे प्रकार घडत आहे. कोविडमुळे मृत्यू होणाऱ्यांचे प्रमाण दिवसाला सरासरी ५५ ते ६० असल्याने यासर्वं मृतदेहांची विल्हेवाट लावताना विद्युत दाहिन्यांच्या चिमणी तप्त तापत असल्याने भविष्यात मोठ्या प्रमाणात विद्युत दाहिनी बंद पडण्याच्या मोठा धोका संभवत आहे.

मुंबईत विविध ठिकाणी ५४ ठिकाणी महापालिकेची ७१ अंतिम संस्कार स्थळे आहेत. यापैकी ११ ठिकाणी विद्युतदाहिनी आहेत. यातील शिवाजीपार्कसह शीव व इतर स्मशानभूमीतील विद्युत दाहिनींचे रुपांतर पीएनजीवर करण्यात आले आहे. त्यामुळे काही दाहिन्या या विद्युत आहेत तर काही दाहिन्या पीएनजीवर आधारीत आहे.या  सर्व ११ ठिकाणी १९  विद्युत तसेच पीएनजी आधारी शवदाहिनी आहेत. विद्युत व गॅस दाहिनीवर  पूर्ण दिवसभरात १४४ मृतदेहांवर अंत्यसंस्कार करण्याची क्षमता आहे. परंतु प्रत्येक अचानक गॅस व विद्युत दाहिनींवरील भार वाढल्याने मोठ्याप्रमाणात अनेक शव दाहिन्यांमध्ये तांत्रिक बिघाड संभवू लागला आहे.

विद्युत दाहिनीवर एका अंत्य संस्कारासाठी अडीच तासाचा कालावधी लागतो. त्यामुळे पूर्वी चार ते पाच मृतदेहांवरच अंत्यसंस्कार केले जायचे. परंतु आाता विद्युत दाहिनी २४ तास सुरु असल्याने याचा भार वाढत आहे. चोविस तास दाहिनी सुरु असल्याने चिमण्यांचे कुलिंग होत नाही. त्यामुळेच तांत्रिक बिघाड संभावतो. त्यामुळे यापूर्वी शिवाजीपार्क, मुलुंड,घाटकोपर तसेच भांडुप अशा विद्युत दाहिन्या बंद पडत आहेत आणि किरकोळ दुरुस्ती करून पुन्हा सुरु केली जात आहे. त्यामुळे अनेक विद्युत दाहिन्यांच्या बाहेर शव वाहिकांच्या रांगाच लागलेल्या पहायला मिळत आहे. दादरमधील स्थानिक शिवसेना नगरसेविका व महापालिका सभागृहनेत्या विशाखा राऊत यांनी, शिवाजीपार्क येथील विद्युत दाहिनी तात्पुरती दुरुस्ती करून पुन्हा सुरु केली आहे. परंतु ही विद्युत दाहिनी बंद ठेवून याचे पूर्णपणे काम करायला हवे. आतापर्यंत याठिकाणी निव्वळ ३५० कोविडच्या मृतदेहांवर अंत्यसंस्कार करण्यात आले असल्याचे त्यांनी सांगितले.

ईशान्य मुंबईचे भाजपचे खासदार मनोज कोटक यांनीही याबाबत तीव्र चिता व्यकत केली. ईशान्य मुंबईतील ४ पैकी ३ विद्युत दाहिनी सुरु असल्याचे सांगितले. यापूर्वी मुलुंड व भांडुप, घाटकोपर या तिन्ही विद्युत दाहिनी बंद पडल्या होत्या. परंतु प्रशासनसोबत पाठपुरावा करून घेत त्या पुन्हा सुरु करुन घेतल्या आहेत. सध्या मुलुंडची बंद होती . मात्र, या विद्युत दाहिन्यांवरील भार लक्षात घेता प्रशासनाने  कांजूर मार्ग पूर्व व विक्रोळी पश्चिम येथील स्मशानभूमीत विद्युत दाहिनीची अतिरिक्त सुविधा उपलब्ध करायला हवी. यासाठी आपला पाठपुरावा सुरु असल्याचे त्यांनी सांगितले.


हे ही वाचा – CoronaVirus: भारतात ‘रेमडेसिवीर’चे उत्पादन घेण्यास, विकण्यास परवानगी


 

First Published on: June 21, 2020 6:24 PM
Exit mobile version