करोनामुळे शासकीय बैठकांवरही आले निर्बंध!

करोनामुळे शासकीय बैठकांवरही आले निर्बंध!

महाराष्ट्र राज्य मंत्रालय

राज्यात करोनाचा धिम्या गतीने होत असलेला फैलाव लक्षात घेता राज्य सरकारने आता नागरिकांप्रमाणेच सरकारी अधिकाऱ्यांसाठी देखील नियमावली जाहीर केली आहे. त्यानुसार, शासकीय बैठकांवर निर्बंध घालण्यात आले आहेत. याबाबतचा अध्यादेश काढण्यात आला असून त्यानुसार गरज नसेल, तर बैठका टाळाव्यात, असं सांगण्यात आलं आहे. शिवाय, जर बैठक घेतलीच, तर बैठकीमध्ये अंतर ठेवूनच बसावे, असं देखील बजावण्यात आलं आहे. करोनाचा प्रादुर्भाव होऊ नये म्हणून, मंत्रालयातील प्रशासकीय विभाग तसेच त्यांच्या नियंत्राणाखाली विभागांना बैठका न घेण्याचे आदेश देण्यात आले आहेत. करोना विषाणूचा प्रादुर्भाव पूर्णपणे नियंत्रणात येईपर्यंत हे निर्देश लागू असतील.

कर्मचाऱ्यांना वर्क फ्रॉम होम, बाजारपेठा आळीपाळीने बंद!

राज्यातील करोनाग्रस्त रुग्णांची संख्या ४८वर गेल्यामुळे राज्य सरकारने करोनाचा फैलाव रोखण्यासाठी अनेक उपाययोजना केल्या आहेत. त्यामध्ये खासगी कार्यालयांना शक्य असल्यास वर्क फ्रॉम होम किंवा ५० टक्के कर्मचाऱ्यांना उपस्थितीची परवानगी असे निर्णय घेण्यात आले आहेत. त्याशिवाय, रस्त्यांवर होणारी गर्दी टाळण्यासाठी आळीपाळीने बाजारपेठा बंद ठेवण्याचे देखील निर्देश राज्यातील सर्व महानगरपालिकांना देण्यात आले आहेत.

सीबीएससीच्या १०वी-१२वी परीक्षा पुढे ढकलल्या

राज्यातल्या शाळा, महाविद्यालये ३१ मार्चपर्यंत बंद ठेवण्याचे आदेश देण्यात आले असून सीबीएससीच्या १०वी आणि १२वीच्या परीक्षा देखील पुढे ढकलण्यात आल्या आहेत. मात्र, महाराष्ट्र बोर्डाच्या परीक्षा नियमित वेळापत्रकानुसारच घेण्यात येणार आहेत. यासाठी या विद्यार्थ्यांना घरूनच सॅनिटायझर आणि मास्क आणण्याच्या सूचना करण्यात आल्या आहेत.

First Published on: March 19, 2020 7:42 PM
Exit mobile version