covid vaccination: तृतीयपंथी, फेरीवाले,एड्सग्रस्तांचे फिरत्या केंद्राद्वारे लसीकरण

covid vaccination: तृतीयपंथी, फेरीवाले,एड्सग्रस्तांचे फिरत्या केंद्राद्वारे लसीकरण

मुंबईत सध्या लसीचा तुटवडा असला तरी लसीकरण मोहीम सुरूच ठेवण्यात आली आहे. फ्रंटलाईन वर्कर, अत्यावश्यक सेवेतील आरोग्य कर्मचारी, विद्यार्थी, गरोदर महिला, स्तनदा माता, ज्येष्ठ नागरिक, अंथरुणाला खिळून असलेले रुग्ण, दिव्यांग व्यक्ती आदींना कोरोना प्रतिबंधक लसीचा डोस देण्यात आले आहेत. मात्र अद्यापही समाजातील दुर्लक्षित तृतीयपंथी, फेरीवाले, एड्सग्रस्त, देहविक्रय करणाऱ्या महिला आदींना मुंबई महापालिकेतर्फे चार फिरत्या लसीकरण
केंद्रांद्वारे लसीचा डोस देण्यात येणार आहे. मुंबई महापालिका आणि व्हॅक्सिन ऑन व्हिल्स्, अमेरिकन इंडिया फाऊंडेशन यांच्या संयुक्त माध्यमातून हा उपक्रम राबविण्यात येणार आहे.

कोविड – १९ विषाणू संसर्ग रोखण्यासाठी लसीकरण हा सर्वात प्रभावी उपाय आहे. जास्तीत-जास्त नागरिकांचे जलद गतीने लसीकरण करण्यासाठी मुंबई महापालिकेच्या वतीने निरनिराळे उपक्रम हाती घेण्यात आले आहेत. शासकीय आणि महापालिका लसीकरण केंद्रांव्यतिरिक्त ज्येष्ठ नागरिकांसाठी ड्राइव्ह इन लसीकरण, अंथरुणास खिळलेल्या नागरिकांचे त्यांच्या घरी जाऊन लसीकरण, गर्भवती महिलांचे लसीकरण असे वेगवेगळे उपक्रम हाती घेतल्यानंतर आता त्यापुढे जाऊन फिरते लसीकरण केंद्र (मोबाईल व्हॅक्सिनेशन युनिट) सुरु करण्यात आले आहेत.

इच्छा असूनही काही अपरिहार्य कारणांनी लसीकरण केंद्रावर येऊन लस घेऊ न शकणाऱया तसेच कोविड संसर्गाची बाधा होण्याचा धोका असलेल्या दुर्लक्षित घटकांपर्यंत जाऊन त्यांचे लसीकरण करण्याचा उपक्रम हाती घेण्यात आला आहे. यामध्ये एचआयव्ही रुग्ण, नाईलाने देह विक्रय करुन उदरनिर्वाह करणाऱया महिला, तृतीयपंथी, बांधकाम कामगार, स्थलांतरित कामगार, रस्त्यावरील विक्रेते अशा विविध समाज घटकांपर्यंत पोहोचून, लसीकरणासाठी त्यांना आवश्यक असलेले सर्व निकष पूर्ण करुन विनामूल्य लस देण्यात येणार आहे. पालिकेने प्रशासकीय विभागनिहाय अशा घटकांची यादी तयार केली आहे. त्यासाठी मुंबई जिल्हा एड्स नियंत्रण संस्था, पदपथावरील विक्रेत्यांची राष्ट्रीय संघटना तसेच इतर संबंधीत बिगर शासकीय संस्थांची मदत घेण्यात आली आहे.

या समाज घटकांच्या कोविड प्रतिबंधक लसीकरणासाठी प्रारंभी एकूण ४ फिरते लसीकरण केंद्र (मोबाईल व्हॅक्सिनेशन युनिट) सुरु करण्यात आले आहेत. प्रत्येक फिरत्या केंद्रामध्ये १ प्रशिक्षित डॉक्टर, २ परिचारिका, २ वैद्यकीय सहाय्यक, रुग्णवाहिका चालक उपलब्ध राहणार आहेत. त्यांना लॅपटॉप आणि वायफाय इंटरनेट सुविधा पुरविली जाणार आहे, जेणेकरुन कोविन संकेतस्थळावर नोंदणी करुन लसीकरणाची पुढील कार्यवाही करता येईल. आवश्यकतेनुसार अशा फिरत्या केंद्रांची संख्या देखील वाढविण्यात येणार आहे.

पालिका अतिरिक्त महापालिका आयुक्त सुरेश काकाणी यांच्या हस्ते झेंडा दाखवून उपक्रमाचा प्रारंभ सोमवारी करण्यात आला. याप्रसंगी, उप आयुक्त (सार्वजनिक आरोग्य) संजय कुऱहाडे, कार्यकारी आरोग्य अधिकारी डॉ. (श्रीमती) मंगला गोमारे, व्हॅक्सीन ऑन व्हिल्स् चे मुख्य कार्यकारी अधिकारी जिग्नेश पटेल, उपक्रम व्यवस्थापक संगीता मोरे आदी मान्यवर उपस्थित होते.

पहिल्याच दिवशी ५० फेरीवाले व देह विक्रय करणाऱ्या २५ महिलांना लस

आज पहिल्या दिवशी महात्मा जोतिराव फुले मंडई परिसरातील पदपथावरील ५० फेरीवाले आणि देह विक्रय करणाऱया २५ महिला यांचे लसीकरण करण्यात आले आहे. १२ ऑगस्टपासून पदपथावरील विक्रेत्यांसाठी बोरिवली भागात पहिले लसीकरण केंद्र तर मालवणी, मालाड, भांडुपमध्ये दुसरे केंद्र कार्यान्वित राहील. देहविक्रय करणाऱया महिलांचे लसीकरण करण्यासाठी भांडुप-मुलुंडमध्ये तिसरे केंद्र तर ग्रँटरोड आणि कामाठीपुरा भागात चौथे केंद्र कार्यान्वित राहील.


“बऱ्याच दिवसांनंतर मास्क काढून बोलतोय”, मुख्यमंत्र्यांनी जाहीर कार्यक्रमात काढला

First Published on: August 9, 2021 10:34 PM
Exit mobile version