सर्व कर्मचाऱ्यांच्या रजा रद्द; त्वरीत रुजू होण्याचे महापालिकेचे आदेश

सर्व कर्मचाऱ्यांच्या रजा रद्द; त्वरीत रुजू होण्याचे महापालिकेचे आदेश

मुंबई महानगरपालिका

मुंबई महापालिकेच्या अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांना कामावर येण्याचे स्पष्ट आदेश असतानाही या सेवेतील अनेक कामगारांनी दांडी मारण्यास सुरुवात केली आहे. अनेक कामगार महापालिकेच्या आदेशानंतरही कामाला येत नसल्याने आता महापालिकेने अत्यावश्यक सेवेतील सर्वच कामगारांना सक्तीने उपस्थित राहण्याचे निर्देश दिले आहेत. विशेष म्हणजे विभागीय सहायक आयुक्तांनीच आता अत्यावश्यक सेवेतील जे कामगार यापूर्वी सुट्टीवर आहे, त्यासर्वांच्या रजाही आता रद्द करुन त्यांना त्वरीत रुजू होण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.

अत्यावश्यक सेवेतील कामगारांचीही महापालिकेकडे पाठ

मुंबई महापालिकेतील घनकचरा व्यवस्थापन, सार्वजनिक आरोग्य विभाग, किटक नाशक विभाग, पाणी विभाग, अग्निशमन दल, देखभाल विभाग, इमारत आणि आस्थापना विभाग, परवाना, अतिक्रमण निर्मुलन, दुकाने व आस्थापने विभाग, सीडीओ, सुरक्षा खाते तसेच तक्रार अधिकारी आदी विभाग हे अत्यावश्यक सेवेत मोडत आहेत. त्यामुळे करोना विषाणुंचा संसर्ग रोखण्यासाठी सव खासगी आणि सरकारी कार्यालयांना सुट्टी जाहीर करण्यात आली असली तरी या अत्यावश्यक सेवेतील कामगारांना कामावर येणे आवश्यकच आहे. त्यामुळे या सर्व कामगारांना कामावर येता यावे यासाठी एस.टी.महामंडळ तसेच बेस्टच्या बसेस उपलब्ध करून देतानाच मुंबई परिक्षेत्रात आपल्या बसेसची सेवा उपलब्ध करून दिली आहे. मात्र, त्यानंतरही अत्यावश्यक सेवेतील कर्मचारी सेवेत रुजू होत नसून त्यांनी महापालिकेला पाठ दाखवण्यास सुरुवात केली आहे. अत्यावश्यक सेवेतील सध्या केवळ ६० ते ७० टक्केच कर्मचारी उपस्थित राहत असल्याची माहिती मिळत आहे.

त्यामुळे प्रत्येक विभाग कार्यालयांमध्येच अत्यावश्यक सेवेतील कामगारांची संख्या कमी असल्याने खुद्द सर्व विभागीय सहायक आयुक्तांनी या सेवेत मोडणाऱ्या प्रत्येक खात्यातील कर्मचाऱ्यांसाठी परिपत्रक जारी केले आहे. महापालिका आयुक्त प्रविणसिंह परदेशी यांनी विभागीय सहायक आयुक्तांना दिलेल्या अधिकारांतर्गत हे परिपत्रक जारी करून त्यांनी अत्यावश्यक सेवेतील सर्व कामगार,कर्मचाऱ्यांनी त्वरीत सेवेत रुजू होण्याचे निर्देश दिले आहेत. तसेच पुढील आदेश मिळेपर्यंत ज्या कर्मचारी सुट्टीवर आहेत, तसेच काहींनी एलटीए घेतल्या असतील तर त्यांच्या सुट्ट्या रद्द करण्यात येत असल्याचेही आदेश सर्व विभागीय सहायक आयुक्तांनी दिले आहेत.

यासंदर्भात दि म्युनिसिपल युनियनचे सरचिटणीस रमाकांत बने यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी अत्यावश्यक सेवेतील कामगार आणि कामगारांनी कोणतेही कारण न दाखवता कामावर जायला हवे असे सांगत आपण याबाबत महापालिका आयुक्त कार्यालयाचे उपायुक्त चंद्रशेखर चौरे तसेच सामान्य प्रशासनाचे अधिकारी मिलिन सावंत यांची भेट घेवून त्यांना अशा कामगारांसाठी अधिक वाहनांची सुविधा उपलब्ध करून देण्याच सुविधा देण्याची मागणी केली आहे. शिवाय या कामगारांसाठी भोजनाचीही व्यवस्था करण्याची मागणी केली आहे. मात्र, कोणत्याही परिस्थितीत सर्व कामगारांनी आपले कर्तव्य चोख पार पाडण्यासाठी सेवेत रुजू व्हावे,असे आवाहन बने यांनी केले आहे.

मात्र, सामान्य प्रशासन विभागाच्या अधिकाऱ्यांकडून मिळालेल्या माहितीनुसार सुरुवातीचे दोन दिवस कर्मचारी,कामगारांना त्रास झाला असेल. परंतु आता बेस्ट आणि एस.टी बसेसची सुविधा देण्यात आली आहे. तसेच जोखीम भत्ता म्हणून दैनंदिन ३०० रुपयेही दिला जातो. ज्यामध्ये त्याला तिकीट आणि जेवणासाठी खर्च करता येईल. सर्वप्रकारची व्यवस्था झालेली आहे. प्रत्येक विभाग कार्यालय तसेच रुग्णालयांमधून पॉईंट टू पॉईंट बसेसची सुविधा देण्यात आली आहे. शिवाय एस.टी बसचाही रुट निश्चित करण्यात आलेला आहे. त्यामुळे आता सुरुवातीच्या दिवसाप्रमाणे आता कर्मचाऱ्यांना कोणताही त्रास होत नसून पश्चिम रेल्वेनेही ज्या गाड्या सोडल्या आहेत, त्यामध्ये महापालिका कर्मचाऱ्यांना प्रवेश देण्याची तयारी दर्शवली आहे. त्यामुळे अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांना प्रवासासाठी काही वेळ लागेल तर वाहनांची व्यवस्था असल्याचे अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे.


हेही वाचा – धक्कादायक! २ महिन्यांत १५ लाख आंतरराष्ट्रीय प्रवासी भारतात आले


 

First Published on: March 27, 2020 7:08 PM
Exit mobile version