कोरोनाची लागण झालेल्या ९ महिन्याच्या गर्भवती महिलेचा मृत्यू

कोरोनाची लागण झालेल्या ९ महिन्याच्या गर्भवती महिलेचा मृत्यू

गर्भवती महिला

कोरोनाची लागण झालेल्या एका नऊ महिन्याच्या गर्भवती महिलेचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना नालासोपारा येथे घडली आहे. नालासोपारा येथील रहिवासी असणाऱ्या ३० वर्षीय महिलेला कोरोनाची लागण झाली असल्याचे निष्पन्न झाले होते. त्यानंतर त्या महिलेला मुंबईच्या नायर रुग्णालयात दाखल करण्यात आले. तिच्यावर उपचार सुरु होते. मात्र, तिचा ४ एप्रिल रोजी सायंकाळच्या वेळेस मृत्यू झाल्याचे समोर आले आहे. अशा प्रकारचा हा पहिलाच मृत्यू असल्याचे सूत्रांकडून सांगितले जात आहे.

एका दिवसात मुंबईत ५७ नवे रुग्ण

कोरोनाबाधितांची संख्या दिवसेंदिवस वाढताना दिसत आहे. सोमवारी, एका दिवशी ५७ नवे रुग्ण आढळून आले आहेत. तर चार जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. त्यामुळे मुंबईतील कोरोनाबाधितांचा आकडा ४९० वर गेला आहे. त्यापैकी आतापर्यंत ३४ जणांचा मृत्यू झाला आहे. तर ५९ जण कोरोनामुक्त झाले आहेत. तर अजून १५० संशयित रुग्ण दाखल झाले आहेत.

विशेष दवाखाने सुरू

दरम्यान, मुंबईत २२६ परिसर प्रतिबंधित करण्यात आले. अशा प्रतिबंधित क्षेत्रामध्ये रुग्ण तपासणीसाठी विशेष दवाखाने सुरू करण्यात आले असून सोमवारी तुळशी वाडी ताडदेव, मालाड, शीव, शिवाजी नगर, देवनार अशा दहा ठिकाणी आणखी दवाखाने सुरू करण्यात आले. त्यात डॉक्टर, परिचारिका, प्रयोगशाळा तंत्रज्ञ, असे पथक नेमण्यात आले आहे. आतापर्यंत जे रुग्ण सापडले त्यांच्या संपर्कात आलेल्यांना शोधण्यासाठी पालिकेच्या आरोग्य पथकातर्फे १५ लाख नागरिकांचे सर्वेक्षण करण्यात आले आहे.


हेही वाचा – गणेशगल्ली येथे राहणारे कुटुंब कोरोनाबाधित


 

First Published on: April 7, 2020 9:26 AM
Exit mobile version