एचआयव्ही रुग्णांना औषधांसह ‘समुपदेशना’चा डोस महत्त्वाचा

एचआयव्ही रुग्णांना औषधांसह ‘समुपदेशना’चा डोस महत्त्वाचा

एचआयव्ही या आजाराची लक्षणे टीबी किंवा कुष्ठरोग या आजारांसारखी दिसून येत नाहीत. शरीराला एखादा संधीसाधू आजार जडला आणि त्यानंतर काही रक्त तपासणी केल्या तर त्यातून एचआयव्ही असल्याचे समोर येते. पण, तोपर्यंत या आजारांचे विषाणू शरीराच्या अनेक भागात पसरलेले असतात. त्यातून रोगप्रतिकारशक्ती कमी होते. मग, या एचआयव्ही रुग्णांना औषधोपचारावर आणून त्यांचे मनोबल वाढवण्यासाठी प्रयत्न करत समुपदेशन केले जाते. एचआयव्ही रुग्णांना औषधोपचारांसोबत केले जाणारे समुपदेशन हे एचआयव्ही विषाणूंची तीव्रता कमी करू शकते, हे आता सिद्ध झाले आहे. फक्त औषधोपचारच नाही तर त्यासोबतच त्या रुग्णाचे चांगल्या पद्धतीने केले जाणारे समुपदेशन हे त्यांच्या आयुष्यात महत्त्वाची भूमिका बजावू शकते, असा विश्वास जिल्हे एड्स नियंत्रण सोसायटीकडून व्यक्त करण्यात आला आहे.

एचआयव्ही रुग्णांच्या रक्तातील व्हायरल लोड म्हणजेच विषाणूंचे प्रमाण कमी करण्यासाठी मुंबई जिल्हे एड्स नियंत्रण सोसायटीने रुग्णांचे मोठ्या प्रमाणात समुपदेशन केले. सकारात्मक समुपदेशनानंतर या रुग्णांच्या शरीरातील व्हायरल लोडचे प्रमाण एकूण आकडेवारीपैकी ३७ टक्क्यांनी कमी झाले असल्याचे आढळून आले. त्यानुसार, नॅशनल एड्स कंट्रोल ऑर्गनायझेशन म्हणजेच नॅकोनेही रुग्णांच्या रक्तातील व्हायरल लोड कमी करण्यासाठी आपल्या नियमावलीत बदल केले आहेत.

एचआयव्ही रुग्णांच्या रक्तातील विषाणूंचे प्रमाण तपासण्यासाठी व्हायरल लोड रक्ततपासणी केली जाते. ज्या रुग्णांच्या रक्तातील विषाणूंचे प्रमाण हजारांपेक्षा जास्त असते, त्यांना औषधे बदलून देण्याचा नियम नॅकोच्या नियमावलीत होता. पण, तो रुग्ण दिलेल्या गोळ्या, औषधे घेतो की नाही यासाठी समुपदेशन करणे गरजेचे असते. त्यांची विचारणा करणे गरजेचे असते. नाहीतर त्यांच्या रक्तातील विषाणूंचे प्रमाण वाढते आणि यावर वेळीच उपचार न झाल्यास रुग्णाचा मृत्यू होतो. यासाठी ‘मुंबई जिल्हे एड्स नियंत्रण सोसायटी’ (एमडेक्स)ने रक्तातील व्हायरल लोडचे प्रमाण जास्त असणार्‍या रुग्णांचे समुपदेशन केले आणि त्यामुळे, बहुतेक रुग्णांचा व्हायरल लोड कमी झाला, त्यामुळे नॅकोनेही आपल्या नियमावलीत बदल केले आहेत.

याविषयी अधिक माहिती देताना मुंबई जिल्हे एड्स नियंत्रण सोसायटीच्या अतिरिक्त संचालक डॉ. श्रीकला आचार्य यांनी सांगितले की, फेब्रुवारी २०१८ पासून व्हायरल लोड ही चाचणी सुरू केली आहे. पण, फक्त गोळ्या घेऊन एचआयव्हीच्या विषाणूंची तीव्रता कमी होणार नाही. त्या रुग्णाने दिलेल्या गोळ्या घेतल्या पाहिजेत या सकारात्मक उद्देशाने मुंबईतील १७ एआरटी सेंटर्सवर गोळ्यांसह योग्य पद्धतीने समुपदेशन करण्याचा निर्णय घेतला. एआरटी केंद्रात समुपदेशक रुग्णांशी चर्चा करून औषधे नियमितपणे का घेत नाही? याचे कारण जाणून घेऊन त्या समस्येवर मार्ग काढतात. २ ते ३ समुपदेशनानंतर रुग्णांची व्हायरल लोड चाचणी पुन्हा केली जाते. त्यानुसार, आता रुग्ण औषधांना प्रतिसाद देत असून, विषाणूंचे प्रमाण ३७ टक्क्यांनी कमी झाले आहे.

खासगी किंवा सार्वजनिक या दोन्ही हॉस्पिटल्समध्ये जर एखादी व्यक्ती उपचार घेत असेल. पण, एचआयव्हीचे विषाणू कमी होण्यासाठी दिली जाणारी औषधेच जर रुग्ण घेत नसेल तर त्या गोळ्यांचा तेवढा फरक पडणार नाही. त्यामुळे, एचआयव्ही रुग्णांनी सकारात्मक दृष्टीकोन ठेवून आपल्या शरीरात असलेले विषाणू आणखी वाढून त्याचे रूपांतर एड्समध्ये होऊ नये यासाठी उपचारांबाबत मार्गदर्शन, प्रोत्साहन आणि समुपदेशन करून त्यांनी उपचार नियमित घेतल्यास त्यांचा आजार नियंत्रणात येऊ शकतो. त्यांची रोगप्रतिकारशक्तीदेखील कमी होऊ शकत नाही आणि त्या व्यक्तीपासून दुसर्‍या व्यक्तीला एचआयव्ही होण्याचे प्रमाण कमी होऊ शकते, असा ही सल्ला डॉ. आचार्य यांनी दिला आहे.

मुंबईतील एकूण १७ एआरटी केंद्रात आतापर्यंत ३७ हजार ६८१ एचआयव्ही रुग्णांची नोंद झाली आहे. यातील ११, ७१९ रुग्णांची व्हायरल लोड चाचणी करण्यात आली. यात रक्तातील विषाणूंचे प्रमाण हजारांपेक्षा जास्त असणार्‍या रुग्णांची संख्या २ हजार ४२६ इतकी होती. यात केवळ १ हजार ७५० रुग्णांनी समुपदेशन करून घेतले. त्यापैकी ३८९ जणांच्या म्हणजेच ३७ टक्के रुग्णांच्या शरीरातील विषाणूंचे प्रमाण कमी झाले असल्याचे आढळले आहे. त्यानुसार, आता भारत सरकारने आपल्या नियमावलीत बदल करून व्हायरल लोड जास्त असणार्‍या रुग्णांना औषधोपचारांसह समुपदेशन द्या असे म्हटले आहे. त्यानुसार, आता सर्व राज्यातदेखील याची अंमलबजावणी केली जाणार आहे.
– डॉ. श्रीकला आचार्य, अतिरिक्त संचालक, मुंबई जिल्हे एड्स नियंत्रण सोसायटी

First Published on: January 28, 2019 5:04 AM
Exit mobile version