दहिहंडीचा उत्साह ! जिल्हा पालघर…थर लागले सरसर

दहिहंडीचा उत्साह ! जिल्हा पालघर…थर लागले सरसर

पालघर : पालघर जिल्ह्यात दहीहंडीचा सण मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.जिल्ह्यातील सर्वच तालुक्यांत हा उत्साह होता. वाडा तालुक्यात आज दहीहंडी उत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.विविध गोविंदा पथकांनी आज हजेरी लावत सलामी दिल्या.विशेष म्हणजे यावर्षी मोखाडा व जव्हार मधील गोविंदा पथके वाडा तालुक्यात येऊन त्यांनीही दहीहंडी उत्सवात सहभागी होत सलामी दिली.त्यांना रोख पारितोषिक व सन्मानचिन्ह देऊन त्यांचा सन्मान करण्यात आला. महिला गोविंदा पथकांनी सलामी देत आम्हीही पुरूषांच्या खांद्यांला खांदा लावून आहोत हे दाखवून दिले. वाडा शहरात जिजाऊ संघटनेने दहीहंडीचे आयोजन केले होते.यादहीहंडीत जव्हार मोखाड्यातील गोविंदा पथकांनी सलामी दिल्या.मोखाड्याच्या गावदेवी गोविंदा पथक जांभ्याचा पाडा या गोविंदा पथकाने सातव्या थरावर सलामी देत पारितोषिक मिळवले.

पी.जे.हायस्कूल वाडाच्या पटांगणात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे दहीहंडीचे आयोजन केले होते. या दहीहंडीत अनेक गोविंदा हजेरी लावत सलामी दिल्या.आई एकविरा महिला गोविंदा पथकाने पाचव्या थरावर सलामी देत आम्हीही काही कमी नाहीत हे दाखवून दिले. मराठी गाण्यांचा नजराणा मनसेच्या दहीहंडीत पहावयास मिळाला.कुडूस येथे नवनिर्माण सामाजिक संस्थेच्या वतीने दहीहंडीचे आयोजन केले होते. या दहीहंडीत अनेक पुरुष व महिला गोविंदा पथकांनी हजेरी लावत सलामी दिल्या. त्यांना 1 हजार 111 रूपये रोख व सन्मानचिन्ह देण्यात आले. या ठिकाणी डी.जे च्या तालावर गोविंदांनी ताल धरत थिरकले.दरम्यान गोविंदाचा उत्साह आज शिगेला पोहोचला असल्याचे दिसून आले. तालुक्यातील अनेक गावात आज छोटेखानी दहीहंडी उत्सव साजरा करण्यात आला.

बोईसर शहरातील शाळांमध्ये गोपाळकाला साजरा करण्यात आला. तसेच आगामी वर्षे निवडणुकांचे असल्याने सर्वच राजकीय पक्षांनी व नेत्यांनी ठिकठिकाणी दहीहंड्यांचे आयोजन केल्यामुळे त्यांची संख्या जशी वाढली होती. पिंक सिटी ओस्तवाल,माजी कृषी व पशुसंवर्धन सभापती पालघर जिल्हा व भारतीय जनता पार्टीचे जिल्हा उपाध्यक्ष अशोक सदू वडे ह्यांनी दरवर्षी प्रमाणे यंदाही बोईसर येथे दही हंडी उत्सव आयोजित केला होता. तसेच शिवसेना,शवशक्ती सामाजिक संघटना, शिव सम्राट प्रतिष्ठान निलम संखे, मुकेश पाटील यांस कडून दहिहंडी उत्सवाचे आयोजन करण्यात आले होते .तर बहुजन विकास आघाडी तर्फे खैरेपाडा येथे हंडीचे आयोजन करण्यात आले होते. या

राजकीय पक्ष मैदानात

शिवसेना, भाजप, मनसे, काँग्रेस , राष्ट्रवादी काँग्रेस बहुजन विकास आघाडी याप्रमुख पक्षांसह अनेक मंडळांनी दहीहंडी उत्सवासाठी मोठ-मोठी बक्षिस लावली होती. या उत्सवांमध्ये शेकडो पथकांनी सहभाग घेतला होता.  राजकीय पक्षांनी लाखो रुपयांची बक्षिसे लावल्याने गोविंद पथकेही मोठ्या संख्येने रस्त्यावर उतरली होती. दहीहंडी फोडण्यासाठी रचल्या जाणार्‍या मानवी मनोर्‍यांमुळे याउत्सवी उत्साहाला दु:खाचे गालबोट लागू नये यासाठी रुग्णवाहिका सेवांनी पुढाकार घेतला होता.

दहीहंडी,गौरी नाच, तारपा नाच आणि कबड्डी

जन्माष्टमी आणि गोपाळकाला निमित्त डहाणूतील विवळवेढे गावात उत्साह पाहायला मिळाला आहे. नवतरुण युवकांसोबत जाणत्या नागरिकांनी देखील उत्सवात सहभागी होत उत्सवाचा आनंद लुटला आहे. पालघर जिल्ह्यात ठिकठिकाणी आनंदोत्सव साजरा होत असताना विवळवेढे गावाने देखील ह्यात आपला सहभाग नोंदवला असून, मोठ्या जल्लोषात गोपाळकाला साजरा केला आहे.जन्माष्टमी निमित्त आयोजित कार्यक्रमामध्ये पारंपरिक आदिवासी गौरी नच करून आनंद व्यक्त करण्यात आला होता. त्यांनतर दुसर्‍या दिवशी दहीहंडीचा कार्यक्रम घेण्यात आला असून ह्यात मोठ्या प्रमाणात नागरिकांनी सहभाग नोंदवला आहे. दहीहंडी कार्यक्रमादरम्यान गौरी नाच, तारपा नाच, कबड्डी ह्यासारखे खेळ खेळून कार्यक्रमाची शोभा वाढवण्याचे काम तरुणांनी केले आहे. सध्याच्या स्मार्ट युगात आपण कुठेतरी आपले सण – उत्सव मागे सोडत चाललो आहोत. आपले सण उत्सव आपणच जपायला हवेत जेणे करून आपल्या पुढच्या पिढीला देखील ह्याची माहिती मिळाली पाहिजे ह्याचे एक उत्तम उदाहरण विवळवेढे गावकर्‍यांनी दहीहंडीच्या माध्यमातून दिले आहे.

First Published on: August 19, 2022 8:36 PM
Exit mobile version