भिवंडीतील तरुणाची साडेचार लाखांची फसवणूक

भिवंडीतील तरुणाची साडेचार लाखांची फसवणूक

महेंद्रा व्हीएक्सवाय 500 ही कार दिवाळी धमाका ऑफरमध्ये तुम्हाला बक्षीस म्हणून लागली आहे. असा मॅसेज आला असता त्याला तरुणाने प्रतिसाद दिला नाही. मात्र, त्यानंतर भामट्यांनी या तरुणाचा विश्वास संपादन करून तुम्हाला गाडी नको असेल तर 14 लाख 84 हजार रुपये मिळतील, असे आमिष दाखवून त्यासाठी 4 लाख 45 हजार 800 रुपयांची रोकड फोन पे अ‍ॅपद्वारे आगाऊ घेऊन तरुणाची फसवणूक केल्याची खळबळजनक घटना भिवंडीतील कोनगाव जांभुळवाडी येथे उघडकीस आली आहे. पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल केला आहे.

इंद्रकुमार सोपान देगांवकर (20 रा. कोनगाव) असे फसवणूक झालेल्या तरुणाचे नाव आहे. या तरुणास संजय शर्मा नावाच्या भामट्याकडून मोबाईलवर 1 नोव्हेंबर रोजी मॅसेज आला होता. त्यामध्ये तुम्हाला महेंद्रा व्हीएक्सवाय 500 ही कार दिवाळी धमाका ऑफरमध्ये लागली आहे. असा बनाव करून जर गाडी नको असेल तर चौदा लाख 84 हजार रुपयांची रोख रक्कम मिळेल. मात्र, त्यासाठी सर्वप्रथम कागदपत्रांची पूर्तता करण्यासाठी 15 हजार 500 रुपये बँक अकाऊंटमध्ये भरावे लागतील असे सांगितले. त्यावर विश्वास ठेवून इंद्रकुमार याने फोन पे अ‍ॅपद्वारे हे पैसे भरले. मात्र, त्यानंतर आणखीन तीन लाख 68 हजार आणि दहा हजार तसेच वडिलांच्या बँक खात्यातून 62 हजार 300 रुपये असे एकूण चार लाख 45 हजार 800 रुपयांची रोकड भरण्यात आली. मात्र, काही दिवस उलटून गेले तरी देखील आपल्या बँक खात्यावर चौदा लाख 84 हजार रुपयांची रक्कम जमा होत नसल्याने इंद्रकुमार याने संबंधित फोनवर संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी हा फोन बंद असल्याचे स्पष्ट झाले.

त्यामुळे आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येताच इंद्रकुमार याने कोनगाव पोलीस ठाण्यात जाऊन घडलेला प्रकार कथन केला. घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलिसांनी तत्काळ संजय शर्मा नावाच्या भामट्या विरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे. या गुन्ह्याचा अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक जीवन शेरखाने करीत आहेत.

First Published on: November 12, 2019 1:17 AM
Exit mobile version