मुंबईतील शीव परिसरात असणा-या बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या लोकमान्य टिळक सर्वोपचार रुग्णालयास सुप्रसिद्ध चित्रपट अभिनेते अमिताभ बच्चन यांनी ‘क्लास – १’ प्रकारातील २ अत्याधुनिक अतिदक्षता व्हेंटिलेटर देणगी स्वरुपात नुकतेच दिले आहेत. त्याचबरोबर मॉनिटर्स, सीआर्म ईमेज इन्टेन्सीफायर, इन्फ्युजन पंप इत्यादी सुमारे रुपये पावणे दोन कोटी किमतीची यंत्र सामुग्री देखील बच्चन यांनी देणगी स्वरुपात रुग्णालयास दिली आहे. या अनुषंगाने रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. मोहन जोशी यांनी रुग्णालयातील सर्व डॉक्टरांच्या व वैद्यकीय कर्मचा-यांच्या वतीने बच्चन यांचे आभार मानले आहेत.
दोन्ही ‘व्हेंटिलेटर’ हे शीव रुग्णालयातील शल्यचिकित्सा विभागात काही दिवसांपूर्वी कार्यान्वित करण्यात आले आहेत. या दोन्ही अत्याधुनिक ‘व्हेंटिलेटर’द्वारे गेल्या काही दिवसात सुमारे ३० गरजू रुग्णांवर प्रभावी उपचार करण्यात आले आहेत, अशी माहिती शीव रुग्णालयाद्वारे देण्यात आली आहे.