मुख्यमंत्र्यांकडून बळीराजाला पीक नुकसानीबद्दल दिलासा

मुख्यमंत्र्यांकडून बळीराजाला पीक नुकसानीबद्दल दिलासा

अवकाळी पावसामुळे राज्यातील शेतकऱ्यांचे झालेले नुकसान आणि राज्य सरकारच्या वतीने करण्यात आलेल्या उपाययोजना यांचा सविस्तर आढावा मुख्यमंत्री फडणवीस यांनी शुक्रवारी वर्षा या शासकीय निवासस्थानी झालेल्या बैठकीत घेतला. शेतकऱ्यांच्या नुकसानीबाबत मंत्रिमंडळ उपसमितीची शनिवारी बैठक घेण्यात येणार आहे. बैठकीस मुख्य सचिव अजोय मेहता, मुख्यमंत्र्यांचे प्रधान सचिव भूषण गगराणी, सार्वजनिक बांधकाम विभागाचे प्रधान सचिव मनोज सौनिक, सहकार विभागाच्या प्रधान सचिव आभा शुक्ला, कृषी व पदुम विभागाचे सचिव एकनाथ डवले, मदत व पुनर्वसन विभागाचे सचिव किशोर राजे निंबाळकर, कोकण विभागीय आयुक्त शिवाजी दौंड, यांच्यासह विविध विभागांचे सचिव, भारतीय हवामान विभाग आणि विविध विमा कंपन्यांचे अधिकारी आदी उपस्थित होते.

विभागीय आयुक्त आणि जिल्हाधिकारी यावेळी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या मदतीने उपस्थित होते. सुमारे ३२५ तालुक्यांमध्ये ५४,२२,००० हेक्टरवर पीकं बाधित झाली आहेत. ज्वारी, मका, धान, तूर, कापूस, सोयाबीन आणि फळपिकं यामुळे बाधित झाली आहेत. प्रभावित भागाचे तत्काळ ड्रोन सर्वेक्षण करण्याचे आदेश सुद्धा मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिले.

‘जगावं की मरावं’ असा प्रश्न आमच्यासमोर; शेतक-यांनी मांडली शरद पवारांसमोर व्यथा

विभागनिहाय शेतपीकांचे नुकसान

साधारणत: ५३ हजार हेक्टरवर फळपिके, १ लाख ४४ हजार हेक्टरवर भात, २ लाख हेक्टरवर ज्वारी, २ लाख हेक्टरवर बाजरी, ५ लाख हेक्टरवर मका, १९ लाख हेक्टरवर सोयाबीन आणि सुमारे तितक्याच हेक्टरवरील कापूस पीकाचे नुकसान झाले आहे.

मुख्यमंत्र्यांनी दिले असे निर्देश

यावर्षी अतिशय प्रचंड पाऊस झाला. एका सुपरसायक्लॉनसह ४ वादळं अरबी समुद्रात तयार झाली. या पावसाची तीव्रता ऑक्टोबरच्या दुसर्‍या आणि तिसर्‍या आठवड्यात अधिक होती. पुरावा म्हणून स्थानिक गावकर्‍यांनी नुकसानीचे काढलेले छायाचित्र सुद्धा ग्राह्य धरण्याचे आदेश देण्यात आले आहेत. प्रशासनाने ही स्थिती संपूर्ण संवेदनशीलतेने आणि सर्वोच्च प्राधान्य देत हाताळावी. प्रत्येक शेतकर्‍याची समस्या ऐकून घेतली जाईल, यासाठी दुष्काळाच्या काळात उभारली तशी यंत्रणा उभारावी. तसेच व्हॉटसअ‍ॅप क्रमांक सुद्धा संपर्कासाठी उपलब्ध करून देण्यात यावेत, असे निर्देश मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिले.

तसेच, अवकाळी पावसामुळे झालेल्या नुकसानीबाबत यंत्रणांनी शेतकऱ्यांपर्यंत पोहचून, त्यांना जास्तीत जास्त दिलासा देता येईल असे प्रयत्न करावेत. क्षेत्रीय स्तरावरील सर्वच यंत्रणांनी या काळात अत्यंत संवेदनशीलतेने कार्यवाही करावी. पंचनामे करण्यासाठी योग्य समन्वय ठेवावा, असे आदेशही त्यांनी दिले.

राज्य सरकार संपूर्णपणे स्थितीवर लक्ष ठेऊन असून, पालकमंत्री आणि लोकप्रतिनिधींनी प्रत्यक्ष बांधावर जाऊन स्थितीचे अवलोकन करावे, असे निर्देश यावेळी मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले. उद्या मंत्रिमंडळ उपसमितीची बैठक सुद्धा बोलाविण्यात आल्याची माहिती यावेळी मुख्यमंत्र्यांनी दिली.


राज्यातील सत्ता घालवू नका; दिल्लीतून मुख्यमंत्र्यांवर वाढला दबाव
First Published on: November 1, 2019 4:15 PM
Exit mobile version