कचरा गाड्यांचे ड्रायव्हर रुग्णवाहिकेवर

कचरा गाड्यांचे ड्रायव्हर रुग्णवाहिकेवर

कचरा गाड्यांचे ड्रायव्हर रुग्णवाहिकेवर

कोरोना रूग्णांच्या वाढत्या संख्येमुळे महापालिकेने रुग्णवाहिका वाढवल्या असल्या तरी या रुग्णवाहिकांसाठी पालिकेला ड्रायव्हर मिळत नसल्याची समस्या उभी राहिली आहे. त्यामुळे घनकचरा व्यवस्थापन विभागाच्या कचरा गाड्यांवरील ड्रायव्हर रुग्णवाहिकांसाठी नेमण्यात आले आहेत. परिणामी अंधेरी, जोगेश्वरी परिसरात कचऱ्याचे ढिग जमा झाल्याची तक्रार पालिकेकडे करण्यात आली आहे.

मुंबईत कोरोना रूग्णांची संख्या झपाट्याने वाढत असताना पालिकेच्या ताफ्यात रुग्णवाहिकांची संख्या कमी आहे. त्यामुळे प्रशासनाने बेस्ट बस आणि खासगी वाहनांचा वापर रूग्णवाहिका म्हणून सुरू केला आहे. अशा विविध प्रकारच्या ४०० हून अधिक रुग्णवाहिका सध्या पालिकेकडे आहेत. त्यासाठी पुरेसे ड्रायव्हर नसल्याने पालिकेने घनकचरा व्यवस्थापन विभागातील कचरा संकलन करणाऱ्या गाड्यांवरील ड्रायव्हर नेमल्याचे अंधेरी येथील के-पूर्व विभागात आढळून आले आहे.

के-पूर्व विभागात अंधेरी, जोगेश्वरी परिसरातील काही भागात कचऱ्याचे ढीग पडून राहात असल्याचे येथील नगरसेवक अभिजीत सामंत यांना आढळून आले. त्याबाबत त्यांनी महापालिकेच्या अंधेरी, सांताक्रुझ येथील गॅरेजमध्ये विचारणा केली असता घनकचऱ्याचे ट्रक चालवणारे चालक सध्या रुग्णवाहिकेवर नेमण्यात आल्याचे सांगण्यात आले. तसेच पुरेसे ड्रायव्हर नसल्याने मुख्य गॅरेजमधून आठपैकी फक्त दोन किंवा तीनच डंपर येत असल्याची माहिती देण्यात आली. याबाबत विचारणा करण्यासाठी घनकचरा व्यवस्थापन विभागाचे उपायुक्त आनंद वाघराळकर यांच्याशी वारंवार प्रयत्न करूनही संपर्क होऊ शकला नाही.

कचरा रोज उचलला न गेल्यास मुंबईत पावसाळी रोगांना निमंत्रण मिळेल. त्यामुळे काही महिन्यांकरिता रुग्णवाहिका अथवा कचऱ्याची वाहने चालवण्याकरिता कंत्राटी चालक नेमावेत, अशी मागणी सामंत यांनी पालिकेकडे केली आहे

First Published on: June 10, 2020 11:58 PM
Exit mobile version