पालिकेच्या संकलन मोहीमेमुळे यंदा नाल्यात ३० टक्के कमी कचरा

पालिकेच्या संकलन मोहीमेमुळे यंदा नाल्यात ३० टक्के कमी कचरा

एका शासन निर्णयाने महापालिकेची ३६०० पदे रिक्त

निवडणूक आचारसंहितेमुळे शासकीय आणि प्रशासकीय कामे ठप्प झाली असली तरी प्राथमिक गरजेच्या कामांमध्ये कोणतीही कुचराई केली जाणार नसल्याचे ठाणे महापालिकेच्या सूत्रांकडून सांगण्यात आले. शहरातील पावसाळा पूर्व नालेसफाईच्या कामांच्या निविदा अंतिम टप्प्यात असल्याचे समजते. यंदा शहरात विविध ठिकाणच्या नाल्यांची ५२ कंत्राटदारांच्या मदतीने सफाई केली जाणार आहे. गेल्या वर्षी नालेसफाईसाठी १० कोटी रूपयांची तरतूद करण्यात आली होती. मात्र यंदा घरोघरी जाऊन कचरा गोळा जात असल्याने नाल्यात दरवर्षीपेक्षा ३० टक्के कमी कचरा गेल्याचे पाहणीत आढळून आले आहे. परिणामी यंदा नाले सफाईसाठी आठ कोटी रूपयांचीच तरतूद करण्यात आली आहे.

२ घरांमधून ५० – ६० टन कचरा गोळा

घरोघरी कचरा संकलीत करण्याची मोहीम गेल्या वर्षाभरात चांगल्या रितीने राबवण्यात आली. सध्या झोपडपट्टी विभागातील दोन लाख घरांमधून ५० ते ६० टन कचरा गोळा केला जात असल्याची माहिती घनकचरा विभागाने दिली. निवडणुकीमुळे नालेसफाईची कामे काहीशी उशिरा सुरू होण्याची चिन्हे आहेत. निविदा प्रसिद्ध होऊन प्रत्यक्ष कामांना सुरूवात होण्यास मे महिना उजाडेल. नाल्याच्या शेजारी राहणारे रहिवासी त्यांचा कचरा नाल्यातच टाकत असल्याने सफाई कुचकामी ठरत होती. त्यावर उपाय म्हणून घंटागाडी फिरू न शकणाऱ्या वस्तीमध्ये घरोघरी जाऊन कचरावेचक कचरा गोळा करत आहेत. झोपडपट्टी विभागातील दोन लाखांहून अधिक घरांमधून सध्या अशाप्रकारे कचरा गोळा केला जात आहे.

रोबोटद्वारे सफाई

गेल्या वर्षी पारसिक डोंगराच्या उतारावरील कचरा गोळा करण्यासाठी जर्मन तंत्रज्ञानाचा अविष्कार असलेला रोबोटचा वापर करण्यात आला होता. यंदा शहरात विविध ठिकाणी नालेसफाईसाठी रोबोट वापरला जाणार आहे.

First Published on: April 15, 2019 6:01 PM
Exit mobile version