भाजपची कॅडबरी तर राष्ट्रवादीची कुल्फी! खडसे-पाटलांमध्ये शाब्दिक चकमक सुरू!

भाजपची कॅडबरी तर राष्ट्रवादीची कुल्फी! खडसे-पाटलांमध्ये शाब्दिक चकमक सुरू!

भाजपचे एकेकाळचे दिग्गज फायरब्रँड नेते एकनाथ खडसे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करून काही तास देखील उलटले नसतानाच आता दोन्ही पक्षांमध्ये या मुद्द्यावरून शाब्दिक चकमक सुरू झाली आहे. यामध्ये आघाडीवर आहेत आता राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते एकनाथ खडसे आणि भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील! खडसेंनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करताच चंद्रकांत पाटील यांनी खडसेंवर खोचक शब्दांमध्ये टीका केली होती. त्याला आता एकनाथ खडसेंनी देखील तितक्याच तिखट शब्दांमध्ये प्रत्युत्तर दिलं आहे. पण विशेष म्हणजे दोन्ही बाजूंनी तिखट टीका करण्यासाठी कुल्फी, लिमलेटची गोळी, कॅडबरी, चॉकलेट अशा गोड शब्दांचा वापर केला जात आहो. त्यामुळे जनतेसाठी मात्र ही गोड शब्दांमधली तिखट टिकेची मेजवानी ठरत आहे!

नक्की झालं काय?

खडसेंच्या राष्ट्रवादी प्रवेशानंतर काही मिनिटांमध्येच चंद्रकांत पाटलांनी त्यांच्यावर तोंडसुख घेतलं होतं. ‘नाथाभाऊंना नक्की काय मिळणार हे अजून ठरलं नाही. समाधान होईल असं काही देऊ या बोलीवर बळेबळे नाथाभाऊ नरीमन पॉइंटच्या घरातून बाहेर पडले. समाधान तर लिमलेटच्या गोळीनेही होतं आणि कॅडबरीनेही होतं. आता खडसेंना काय मिळतंय, गोळी की कॅडबरी हे बघावं लागेल’, असं चंद्रकांत पाटील म्हणाले होते. त्यांच्या या वक्तव्याला काही तास देखील उलटत नाहीत, तोवर एकनाथ खडसेंनी त्यांच्याच भाषेत त्यांना प्रत्युत्तर दिलं आहे.

काय म्हणाले एकनाथ खडसे?

आपल्या भाषणात मांडलेल्या मुद्द्यानेच खडसेंनी पाटलांना उत्तर दिलं आहे. ‘माझ्या आयुष्याची ४० वर्ष मी भाजपला दिली आहेत. त्यामुळे भाजपनं मला काहीही फुकट दिलेलं नाही. मी जे काही मिळवलं, ते माझ्या मनगटाच्या जोरावर मिळवलं आहे. आणि चंद्रकांत पाटील यांचा भाजपशी तसा काय संबंध होता? दादा तुम्ही विद्यार्थी परिषदेतच होता. काहीतरी कुल्फी किंवा चॉकलेट मिळावं म्हणूनच तुम्ही भाजपात आलाात. तुम्हालाच सगळं फुकट मिळालं’, असं खडसे म्हणाले आहेत.

First Published on: October 23, 2020 8:20 PM
Exit mobile version