लेखी परीक्षेऐवजी प्रकल्पावर भर

लेखी परीक्षेऐवजी प्रकल्पावर भर

प्रातिनिधिक फोटो

नवीन मूल्यमापन पद्धतीनुसार पर्यावरणशास्त्र व जलसुरक्षा विषयांमध्ये लेखी परीक्षेऐवजी कार्यशाळेवर भर देण्याचा निर्णय शिक्षण विभागाने घेतला आहे. त्यामुळे अकरावी व बारावीला असणार्‍या पर्यावरणशास्त्र व जलसुरक्षा विषयांमध्ये 50 गुणांची लेखी परीक्षा रद्द करून शिक्षण विभागाने प्रकल्पासाठी 30 तर प्रकल्प वहीसाठी 20 गुण निश्चित करण्यात आले असून, त्यासाठी ‘अ’ ते ‘ड’ यापैकी श्रेणी देण्यात येणार आहे.

शैक्षणिक वर्ष 2019-20 पासून इयत्ता अकरावीसाठी आणि शैक्षणिक वर्ष 2020-21 पासून इयत्ता बारावीसाठी अंतिम मूल्यमापन हे 650 ऐवजी 600 गुणांचे राहील. सद्यस्थितीतील पर्यावरण शास्त्र विषयास देण्यात येणार्‍या 50 गुणांऐवजी प्राप्त गुणांचे श्रेणीमध्ये रूपांतर करण्यात येईल. पर्यावरण शास्त्र विषयामध्ये जलसुरक्षा हा विषय नव्याने समाविष्ट राहील, अशी घोषणा शिक्षणमंत्र्यांकडून करण्यात आली होती. त्याप्रमाणे विभागीय मंडळांना सूचना देऊन मूल्यांकन पद्धती राबविण्याचेही कळविण्यात आले होते.

मात्र शिक्षण विभागाने आता या मूल्यांकन पद्धतीत बदल करून त्यासंबंधीचे शुध्दीपत्रक जारी केले आहे. याचसोबत जीवशास्त्र, भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र विषयांच्या परीक्षेत सहामाही आणि वार्षिक परीक्षा अशा दोन्ही स्तरांवर 30 गुण प्रात्यक्षिक परीक्षांसाठी असल्याचे यापूर्वीच्या योजनेत नमूद केले होते. आता मात्र सहामाहीला प्रात्यक्षिकांची तरतूद रद्द करण्यात आली असून फक्त वार्षिक परीक्षेला प्रात्यक्षिकाचे 30 गुण असणार आहेत. याशिवाय गृहविज्ञान विषय घेणार्‍या विद्यार्थ्यांना यापुढे वस्त्रशास्त्र, अन्नशास्त्र व तंत्रज्ञान, गृहव्यवस्थापन, बालविकास यापैकी दोनच विषय घेता येणार आहेत. अकरावी व बारावीसाठी लेखी मूल्यमापनासोबत विद्यार्थ्यांच्या वेगवेगळ्या क्षमतांचे मापन करण्यासाठी तसेच विद्यार्थ्यांच्या प्रगतीचे सातत्यपूर्ण मूल्यमापन होण्यासाठी अंतर्गत मूल्यमापन समाविष्ट केले आहे.

First Published on: November 13, 2019 1:11 AM
Exit mobile version