पाच वर्षांतील एमबीएचे विद्यार्थी रडारवर

पाच वर्षांतील एमबीएचे विद्यार्थी रडारवर

खासगी संस्थेतून प्रवेश परीक्षा घेऊन व्यवस्थापन पदव्युत्तर अभ्यासक्रमाला (एमबीए/ एमएमएस) पाच वर्षात प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांचे प्रवेश धोक्यात आले आहेत. खासगी संस्थेने बनावट गुणपत्रकाद्वारे 25 विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतल्याचे उघडकीस आले. या विद्यार्थ्यांवर राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्षाकडून (सीईटी) कारवाई करण्यात आली. त्यामुळे खासगी संस्थांमधून प्रवेश घेतलेल्या सुमारे तीन हजार विद्यार्थ्यांच्या कागदपत्रांकडे सीईटीने मोर्चा वळवला असून, त्यांच्या कागदपत्रांची तपासणी करण्यात येणार आहे.

एमबीए प्रवेशासाठी राज्यामध्ये कॅट, सीमॅट व ऍटमासारख्या खासगी संस्थांमधून दिलेली प्रवेश परीक्षासुद्धा ग्राह्य धरण्यात येते. यंदा इंजिनियरींगच्या प्रवेशादरम्यान कमी गुण मिळालेल्या विद्यार्थ्यांना अधिक पर्सेंटाईल मिळाले असल्याचा दावा करत अनेक विद्यार्थ्यांनी प्रवेश नियमन प्राधिकरणाकडे तक्रार केली. पर्सेंटाईल प्रकरणाची चौकशी करताना एमबीएच्या प्रवेशासाठी सादर केलेल्या कागदपत्रांमध्ये अनेक कागदपत्रे ही खोटी असल्याचे आढळून आले. यांची गंभीर दखल घेतल प्राधिकरणाने खासगी संस्थांची परीक्षा दिलेल्या विद्यार्थ्यांच्या गुणपत्रकांची पडताळणी सुरू केली. पडताळणीमध्ये एमबीए/ एमएमएस तब्बल 187 विद्यार्थ्यांनी बनावट गुणपत्रके सादर केल्याचे तसेच 25 विद्यार्थ्यांनी विविध कॉलेजमध्ये प्रवेश घेतल्याचे उघडकीस आले. सीईटीने तातडीने 25 विद्यार्थ्यांचे प्रवेश रद्द करत खोटे कागदपत्रे सादर करणार्‍या विद्यार्थ्यांभोवती कारवाईचा फास आवळला.

त्यानंतर आता सीईटी सेलने 2015 ते 2019 पर्यंत प्रवेश दिलेल्या विद्यार्थ्यांची माहिती प्रवेश नियंत्रण समितीकडून मागविली आहे. ऍटमा संस्थेतून प्रवेश परीक्षा दिलेल्या आणि प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांच्या गुणपत्रकांची तपासणी करण्यात येणार आहे. सीईटी सेलने समितीकडे माहिती मागवली असल्याचे, सेलमधील अधिकार्‍यांनी सांगितले. समितीकडून माहिती मिळताच विद्यार्थ्यांच्या कागदपत्रांची तपासणी करण्यात येणार आहे.

First Published on: October 8, 2019 3:03 AM
Exit mobile version