औषध निर्मितीसाठी मांडूळ सापांना मोठी मागणी

औषध निर्मितीसाठी मांडूळ सापांना मोठी मागणी

मांडूळ साप

मांडूळ सापांची तस्करी करणारी टोळी सक्रिय झाली आहे. देशभरात एका वर्षात २७ साप तस्करांना ताब्यात घेण्यात आले आहे. आशियाई देशात मांडूळ प्रजातीच्या सापाला कोटी रूपये मोजले जात असल्याने वन्यजीव गुन्हे नियंत्रण शाखेकडून पोलीस व वनविभागाला दक्षतेच्या सूचना नुकत्याच मिळाल्या आहेत. दुतोंड्या साप म्हणून प्रचलित असलेल्या मांडूळ (सॅन्ड बो) हा साप वन्यजीव कायद्यांतगत सूची ४ मध्ये मोडतो. शेती, जंगल आणि माती या ठिकाणी हा साप सहजतेने आढळतो. परंतु, मध्यंतरीच्या काळी जादू टोण्यासाठी या सापाची शिकार केली जात होती. वर्षभरापासून दक्षिण पूर्व आशियाई आणि पश्चिमी देशात औषध निर्मितीसाठी भारतीय मांडूळ सापांना मोठ्या प्रमाणात मागणी वाढली आहे.

मांडूळची तस्करी रोखण्यासाठी सतर्क

सुमारे चार ते पाच किलो वजनाचा हा साप पडकल्यानंतर चीन, बांगलादेश, भूतानमार्गे या सापांची तस्करी केली जात असल्याची माहिती समोर आली आहे. ही धक्कादायक बाब उघडकीस आल्यानंतर देश पातळीवर वन्यजीवसंदर्भात कार्यरत दिल्ली येथील वन्यजीव गुन्हे नियंत्रण शाखेने देशातील वनविभाग व पोलीस यंत्रणेला मांडूळ साप तस्करी रोखण्यासाठी सतर्क केले आहे. हा साप बिनविषारी असला तरी गेल्या पाच वर्षांपासून त्याची तस्करी होत असल्याने ही सापाची प्रजात संपून जाईल, असे वाईल्ड लाईफ क्राईम कंट्रोल बोर्डाने आदेशित केले आहे.

आतापर्यंत २७ जणांना अटक

मांडूळ सापाच्या तस्करीप्रकरणी आजपर्यंत देशभरात २७ जणांना आतापर्यंत ताब्यात घेण्यात आले आहे. यात हरियाणा, महाराष्ट्रातील मुंबई, अमरावती, अकोला तर मध्यप्रदेशातील नरसिंगपूर येथून आरोपी ताब्यात घेतले आहे. सशस्त्र सीमा बलाच्या जवानांनी अशा सापाची तस्करी करताना बिहारमध्ये काहींना पकडले. याशिवाय केरळमधील कोची, उत्तरप्रदेशातील दुधवा, पंजाबचे रूपनगर येथे या सापाची तस्करी करताना आरोपी ताब्यात घेण्यात आल्याचे वन्यजीव गुन्हे नियंत्रण शाखेने पत्राद्वारे कळविले.

तस्करीत सर्पमित्रांनी केली घुसखोरी

मांडूळ प्रजातीच्या सापांना आंतरराष्ट्रीय स्तरावर कोटी रूपये मिळत असल्याने देशभरात त्याला मागणी आहे. या सापाला पकडण्यासाठी मोठ्या टोळ्या असून, यात काही सर्पमित्रांनी घुसखोरी केल्याचे बोलले जात आहे. महाराष्ट्र, मध्यप्रदेश, केरळ, उत्तरप्रदेश, दिल्ली व मुंबई हे मांडूळ साप तस्करीचे माहेरघर असल्याची माहिती आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात हा साप विमान अथवा जलमार्गाने भूतान, बांगलादेश मार्गे पोहचविला जातो. सापाची तस्करी करणाऱ्यांना २० ते २५ लाख रूपये मिळतात. उत्तरपूर्व राज्यातून मांडुळ प्रजातीच्या सापाची तस्करी फोफावली असल्याची माहिती आहे.

वन्यजीव कायद्यांतर्गत कारवाई

दिल्ली येथील वन्यजीव गुन्हे नियंत्रण शाखेने मांडूळ सापांची तस्करी रोखण्यासाठी वनविभाग अथवा पोलीस यंत्रणेने व्याघ्र प्रकल्प व अभयारण्यात स्थानिक साप तस्करांवर पाळत ठेवण्याचा सूचना दिल्या आहेत. स्मार्ट पट्रोलिंगच्या माध्यमातून तस्करांवर लक्ष केंद्रित करण्याचे निर्देश देण्यात आले आहे. मांडूळ सापांच्या तस्करीसंदर्भात पूर्वीपासून सतर्कता बाळगून आहोत. विभागातील सर्व वनाधिकाऱ्यांना कारवाई करण्याचे आदेश दिले. मध्यंतरी दोघांना ताब्यात घेतले असून, त्यांच्याविरूद्ध वन्यजीव कायद्यांतर्गत कारवाई केली असल्याची माहिती मुख्य वनसंरक्षक प्रवीण चव्हाण यांनी दिली .

First Published on: December 19, 2018 10:29 PM
Exit mobile version