मुंबईत पुन्हा अग्नितांडव, कांजूरमार्गमध्ये इमारतीला भीषण आग; ५ महिला जखमी

मुंबईत पुन्हा अग्नितांडव, कांजूरमार्गमध्ये इमारतीला भीषण आग; ५ महिला जखमी

मुंबई पुन्हा एकदा आगीची घटना घडली आहे. कांजूरमार्ग परिसरात एका इमारतीला आग लागली आहे (fire broke out at Kanjurmarg). ही आग इतकी मोठी आहे की, आजूबाजूच्या परिसरात धुराचे लोट पसरले आहेत. आज (रविवार) सकाळच्या सुमारास ही घटना घडली.

कांजूरमार्ग पूर्व इथल्या कर्वे नगर परिसरात असलेल्या एमएमआरडीएच्या १४ मजली इमारतीला ही आग लागली. आगीची माहिती मिळताच अग्निशामक दलाच्या ३ गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या. इलेक्ट्रिक शॉर्टसर्किटमुळे ही आग लागल्याचं सांगण्यात येत आहे. इमारतीच्या जिन्यावर धूर पसरल्याने पायऱ्या दिसत नव्हत्या. त्यामुळे अनेक लोक इमारतीमध्ये अडकले होते. तसंच धुराचं प्रमाण जास्त असल्यानं इथल्या लोकांना श्वास घेण्यासाठी अडचणी येऊ लागल्या. यात या इमारतीमधील ५ महिलांचा श्वास गुदमरला. यानंतर त्यांना तातडीने जवळच्या रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं आहे.

इमारतीच्या इलेक्ट्रिक वायरिंगपर्यंतच ही आग मर्यादित होती. या इमारतीच्या तळ मजल्यावरील कॉमन इलेक्ट्रिक मीटर कॅबिन आहे. यात इलेक्ट्रिक इन्स्टॉलेशन आणि ग्राउंड प्लसवरच्या १४ मजल्यांच्या निवासी इमारतीच्या इलेक्ट्रिक डक्टमध्ये ही आग पसरली होती. अग्निशामक दलाच्या अधिकाऱ्यांनी जवळपास एक तासापर्यंत बचाव कार्य सुरूच ठेवले. एक तासाच्या अथक प्रयत्नानंतर अग्निशमक विभागाच्या अधिकाऱ्यांना या आगीवर नियंत्रण मिळवण्यात यथ प्राप्त झालं.

दोन दिवसांपूर्वीच चुनाभट्टीमधील इमारतीला लागली होती आग
चुनाभट्टी येथील गोदरेज कोलेजियम या इमारतीला दोन दिवसांपूर्वीच भीषण आग लागली. शेकडो विविध कार्यालय असलेल्या १३ मजली या इमारतीच्या ११ ते १३ मजल्यांपर्यंत ही आग लागली होती. यात काही कर्मचारी अडकले होते. परंतु घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या ६ गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या. सर्वांना सुरक्षित बाहेर काढण्यात आलं.

First Published on: March 26, 2023 2:37 PM
Exit mobile version