चुनाभट्टीतील गोदरेज इमारतीला भीषण आग

चुनाभट्टीतील गोदरेज इमारतीला भीषण आग

गेल्या काही दिवसांत मुंबईमध्ये आगीच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. सुदैवाने या आगीमध्ये कोणतीही जीवितहानी होत नसली तरी, मोठ्या प्रमाणात वित्तहानी होत आहे. आज शुक्रवारी सायंकाळी चुनाभट्टी येथे इमारतीला लागलेल्या आगीने एकच खळबळ उडाली.

चुनाभट्टीमध्ये असलेल्या सोमय्या रुग्णालय, एव्हराट नगर येथील गोदरेज कमर्शियल इमारतीच्या 11 व्या मजल्यावर भीषण आग लागल्याची घटना आज शुक्रवारी (ता. 24 मार्च) सायंकाळच्या सुमारास घडली. सुदैवाने या आगीत कोणीही जखमी झाले नसल्याची माहिती समोर आली आहे.

सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, जीटीबी, सोमय्या रुग्णालय, एव्हराट नगर येथील तळमजला अधिक 11 मजली गोदरेज कमर्शियल इमारतीच्या 11 व्या मजल्यावरील कार्यालयात शुक्रवारी सायंकाळी 5.45 वाजताच्या सुमारास आग लागल्याची घटना घडली. या आगीत कार्यालयातील फाईल्स, इतर सामान जळाले. ही आग हळूहळू वाढत गेल्याचे सांगण्यात येत आहे. या आगीच्या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली.

आगीची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या जवानांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. आगीची भीषणता पाहता अग्निशमन दलाने सायंकाळी 6.22 वाजताच्या सुमारास आग स्तर-1 ची असल्याचे जाहीर केले. दरम्यान, अग्निशमन दलाच्या जवानांनी 5 फायर इंजिन व 4 जंबो वॉटर टँकर यांच्या साहाय्याने आगीवर नियंत्रण मिळविण्याचा प्रयत्न केला. सायंकाळी उशिराने सदर भीषण आगीवर नियंत्रण मिळविले. सुदैवाने या आगीच्या घटनेत कोणीही जखमी झाले नाही.

तसेच, आगीच्या ठिकाणी स्थानिक पोलीस, पालिका यंत्रणा, अदानी वीज कंपनीचे अधिकारी, कर्मचारी, अग्निशमन दलाचे अधिकारी व जवान हे उपस्थित होते. मात्र ही आग का व कशी काय लागली, याबाबत स्थानिक पोलीस, अग्निशमन दलाचे अधिकारी अधिक तपास करीत आहेत.

दरम्यान, गेल्या काही दिवसांपूर्वी मालाड येथील आप्पा पाडा झोपडपट्टीला भीषण आग लागली होती. या आगीमध्ये या परिसरातील 2 हजारांपेक्षा अधिक घरे जळाल्याचे सांगण्यात आले होते. सुदैवाने त्या आगीमध्ये कोणतीही जीवितहानी झालेली नव्हती. परंतु, या आगीत अनेकांचे संसार उध्वस्त झाले.


हेही वाचा – बैलगाडा शर्यतीत महिलेचा अपघाती मृत्यू; आयोजकांवर गुन्हा दाखल

First Published on: March 24, 2023 7:45 PM
Exit mobile version