नवीन हँकाॅक पुलावर पहिला अपघात; तिघेजण जखमी

नवीन हँकाॅक पुलावर पहिला अपघात; तिघेजण जखमी

मुंबई महापालिकेने कोट्यवधी रुपये खर्चून नव्याने उभारलेल्या हँकाॅक पुलावर गुरुवारी मोटारसायकल घसरून झालेल्या अपघातात एक शिक्षक व त्याची दोन मुले असे तिघेजण जखमी झाले आहेत. या अपघाताची तातडीने दखल घेऊन पालिकेने घटनास्थळी आवश्यक त्या उपाययोजना युद्धपातळीवर केल्या.

मुंबई महापालिकेने रेल्वे प्रशासनाच्या सहकार्याने हँकाॅक पुलाचे काम नुकतेच पूर्ण केले. दोन दिवसांपूर्वीच हा पूल वाहतुकीसाठी खुला करण्यात आला. मात्र या हँकाॅक उड्डाणपुलाच्या माझगावकडील उताराच्या बाजूने काही प्रमाणात पाणी साचले होते. गुरूवारी त्या ठिकाणी आपल्या मोटारसायकलवर बसून आपल्या दोन मुलांसह प्रवास करणाऱ्या एका शिक्षकाची मोटारसायकल अचानक घसरली व ते तिघेजण पडले. सुदैवाने मोठा गंभीर अपघात झाला नाही. मात्र या अपघातात सदर शिक्षक व त्यांच्या दोन्ही मुलांना मार लागून ते जखमी झाले. त्यांच्यावर तातडीने वैद्यकीय उपचार करण्यात आले.

या अपघातासंदर्भातील माहिती प्राप्त होताच, पालिका प्रशासनाने सदर ठिकाणी साचलेल्या पाण्याचा तात्काळ निचरा करून आवश्यक त्या उपाययोजना केल्या आहेत. मात्र नव्याने उभारलेल्या हँकाॅक पुलावर अवघ्या दोन दिवसांतच वाहन अपघात झाल्याने व त्यात तिघेजण जखमी झाल्याने चर्चेला उधाण आले आहे.


हेही वाचा : महाराष्ट्रातील सत्तासंघर्षाचा पेच कायम, सर्वोच्च न्यायालयातील पुढील सुनावणी ८ ऑगस्टला


First Published on: August 4, 2022 9:59 PM
Exit mobile version