येऊरमध्ये आता खेळांवर बंदी; वनविभागाची टर्फ क्लबला नोटीस

येऊरमध्ये आता खेळांवर बंदी; वनविभागाची टर्फ क्लबला नोटीस

येऊरमध्ये आता खेळांवर बंदी

मॉनिंग वॉकसाठी जाणाऱ्या नागरिकांना पासशिवाय नो एन्ट्रीचा फतवा संजय गांधी राष्ट्रीय उद्यान यांच्याकडून काढला असतानाच, आता ठाण्यातील निसर्गरम्य येऊर परिसरातील मैदानावर होणाऱ्या खेळांवर देखील बंदी घालण्यात आली आहे. ठाण्याच्या वनविभागाने टर्फ क्लबला नोटीस बजावून तशी ताकीद दिली आहे. येऊर एन्व्हायर्नमेंटल सोसायटीच्या माध्यमातून अनेक दिवसांपासून वनविभागाकडे पाठपुरावा सुरू होता अखेर त्यांच्या प्रयत्नांना यश आले आहे.

बिबट्याचा बछडा रस्त्याच्या कडेला आढळून

येऊर येथील पर्यावरणीय संवेदनशील क्षेत्रात रात्री बेरात्री प्रखर प्रकाशझोतात तसेच लाऊडस्पीकर लावून चालणाऱ्या खेळांना तसेच लग्नसमारंभाना बंदी घालण्यात यावी यासाठी येऊर येथील स्थानिक नागरिक आणि येऊर एन्व्हायर्नमेंटल सोसायटीच्या माध्यमातून पोलीस प्रशासन तसेच वन अधिकाऱ्यांकडे अनेक महिन्यांपासून पाठपुरावा केला होता. प्रखर प्रकाशझोतामुळे आणि गोंगाटामुळे वन्यजीवांच्या हालचालींवर निर्बंध येतात. तसेच ते वाट देखील चुकतात. बुधवार, ४ डिसेंबरला बिबट्याचा बछडा रस्त्याच्या कडेला आढळून आला होता. त्यावरून वन्यजीवन हे रात्रीच्या खेळांमुळे आणि पार्ट्यांमुळे कसे विस्कळीत झाले आहे याकडेही त्यांनी लक्ष वेधले होते. अखेर खडबडून जागे झालेल्या वनविभागाने तातडीने पावले उचलत टर्फ क्लबना नोटीसा बजावल्या आहेत. येऊर परिक्षेत्र अधिकारी राजेंद्र पवार यांनी रसिक सावला, अविनाश सिंग आणि गुरूकूल क्रिकेट अॅकडेमी यांना या नोटीसा बजावल्या आहेत.

संपूर्ण येऊर गाव हे पर्यावरण संवेदनशिल क्षेत्रात राखीव केलेले आहे. आपल्या मार्फत चालणाऱ्या खेळांमुळे वन्यजीवांच्या आधिवासात बाधा उत्पन्न होत असून त्यामुळे वन्यजीवांच्या जीवीतावर विपरीत परिणाम होत आहे. संजय गांधी राष्ट्रीय उद्यानालगत असलेले येऊर गाव हे पूर्ण शांतता झोनमध्ये येत असून सदर ठिकाणी रात्री १० वाजल्यानंतर कोणताही जमाव जमा करून ध्वनी करणे निषिध्द आहे. त्यामुळे नोटीस मिळाल्यापासून खेळ तात्काळ बंद करावेत अन्यथा आपणाविरोधात पर्यावरण अधिनियम १९८६ व वन्यजीव (संरक्षण) अधिनियम १९७२, ध्वनी प्रदूषण अधिनियम २००० अन्वये कठेार कारवाई करण्यात येईल, असेही नोटीसमध्ये नमदू करण्यात आले आहे.


हेही वाचा – कुर्ल्यात पोलिसाला कोब्राने डसले; कॉन्स्टेबलचा जागीच मृत्यू


 

First Published on: December 10, 2019 8:03 PM
Exit mobile version