Karnala bank scam: माजी आमदार विवेक पाटील यांना अखेर ED ने केली अटक

Karnala bank scam: माजी आमदार विवेक पाटील यांना अखेर ED ने केली अटक

कर्नाळा बँक घोटाळ्याप्रकरणी माजी आमदार विवेक पाटील यांना ईडीकडून अटक

कर्नाळा बँकेतील करोडो रुपयांच्या भ्रष्टाचाराला जबाबदार असलेले शेकापचे माजी आमदार आणि कर्नाळा बँकेचे अध्यक्ष विवेक पाटील यांना अखेर आज अटक करण्यात आली. ईडीने विवेक पाटील यांना त्यांच्या पनवेल येथील घरातून ताब्यात घेतले. या गैरव्यवहारात मनीलाँड्रींग झाल्याचा आरोप करण्यात आला आहे. दरम्यान, पनवेलमध्ये या गैर व्यवहारात विरोधात काही महिन्यांपूर्वी मोर्चे काढण्यात आले होते. विवेक पाटील यांच्या धोरणामुळे ठेवीदार संकटात सापडले होते. सदर प्रकरणी विवेक पाटील यांना अटक करावी, यामागणीसाठी आमदार प्रशांत ठाकूर, आमदार महेश बालदी यांच्या नेतृत्वाखाली अनेक मोर्चे, आंदोलने करण्यात आली होती.

कर्नाळा बँकेच्या घोटाळ्यामुळे हजारो ठेवीदारांना व खातेदारांना मोठ्या प्रमाणात आर्थिक संकटाना सामोरे जावे लागत आहे. वारंवार आश्वासने देण्याचे काम शेकापचे नेते विवेक पाटील यांनी केले, मात्र पैसे दिले जात नाही तर दुसरीकडे सरकार याकडे लक्ष देत नसल्याचा ठपका विरोधकांनी ठेवला होता. त्यामुळे ठेवीदारांना त्यांच्या हक्काचे पैसे परत मिळावेत, यासाठी कर्नाळा बँक ठेवीदार संघर्ष समितीच्या माध्यमातून पनवेल येथील कर्नाळा बँकेच्या मुख्य शाखेवर ठेवीदारांचा भव्य मोर्चा अनेकवेळा धडकला. सदर आंदोलन सुरूच होते.

कर्नाळा बँकेत ५१३ कोटी रुपयांचा घोटाळा उघडकीस झाला असतानाही बँकेचे अध्यक्ष व माजी आमदार विवेक पाटील ठेवीदारांना टोलवाटोलवीची उत्तरे देत, ठेवीदार, खातेदार व त्यांच्यावर विसंबून असलेल्या हजारो कुटुंबियांच्या आयुष्याशी खेळत आहे. विवेक पाटील यांच्या धोरणामुळे आज अनेकांचे जीवन उध्वस्त होण्याच्या मार्गावर आहे. या सर्व प्रकरणामुळे ठेवीदार संकटात सापडले असून त्यांना दिलासा व न्याय देण्याच्या भूमिकेतून माजी खासदार किरीट सोमैय्या यांच्या मार्गदर्शनाखाली आमदार प्रशांत ठाकूर, आमदार महेश बालदी कर्नाळा बँक ठेवीदार संघर्ष समितीच्या माध्यमातून कार्यरत आहेत. त्या अनुषंगाने अनेक मोर्चे काढण्यात आले. दरम्यान, ईडीने मागच्या महिन्यात विवेक पाटील यांची वाहने देखील जप्त केली होती. अखेर विवेक पाटील यांना अटक करण्यात आली.


First Published on: June 15, 2021 10:51 PM
Exit mobile version