काँग्रेसच्या इंधन दरवाढ आंदोलनाचा विचका; नेते, कार्यकर्त्यांचा भार बैलांना असह्य

काँग्रेसच्या इंधन दरवाढ आंदोलनाचा विचका; नेते, कार्यकर्त्यांचा भार बैलांना असह्य

काँग्रेसच्या इंधन दरवाढ आंदोलनाचा विचका; नेते, कार्यकर्त्यांचा भार बैलांना असह्य

पेट्रोल आणि डिझेल दरवाढीच्या विरोधात काँग्रेसने शनिवारी केलेल्या आंदोलनाचा विचका झाला. बैलगाडीवर चढून इंधन दरवाढीचा निषेध करणाऱ्या नेते आणि कार्यकर्त्यांचा भार बैलांना असह्य झाला आणि गाडी मोडली. परिणामी काँग्रेसला आपले आंदोलन गुंडाळावे लागले. इंधन दरवाढीच्या विरोधात काँग्रेस पक्ष आक्रमक झाला आहे. पक्षाकडून सातत्याने आंदोलन सुरू आहे. शनिवारी मुंबई काँग्रेसच्यावतीने अध्यक्ष भाई जगताप यांच्या नेतृत्वाखाली मोर्चा काढण्यात आला. यावेळी काँग्रेसचे नेते बैलगाडीतून आले. बैलगाडीची क्षमता लक्षात न घेता नेते, कार्यकर्ते बैलगाडीत चढले होते.

जगताप यांच्यासह १० ते १२ कार्यकर्ते रिकामा सिलेंडर घेऊन केंद्र सरकारच्या विरोधात घोषणाबाजी करत होते. काँग्रेस नेते राहुल गांधी यांचा जयजयकार होत असतानाच भार जास्त होऊन बैलगाडी मोडली आणि भाई जगताप यांच्यासह गाडीत असलेले सर्वच कार्यकर्ते जमिनीवर कोसळले. त्यामुळे आंदोलनात गोंधळ उडाला. कार्यकर्त्यांनी  मोडलेल्या बैलगाडीतून जगताप यांची सुटका केली. अचानक घडलेल्या प्रकारामुळे काँग्रेस कार्यकर्ते गोंधळले होते. त्यामुळे हे आंदोलन गुंडाळण्यात आले.

दरम्यान, या आंदोलनावरून भाजपने काँग्रेसला चिमटा काढला आहे. ‘भाई जगतापजी, तोल सांभाळा…महाराष्ट्रात अभद्र आघाडी करताना राजकीय तोल गेलाच आहे. तुमचे ओझे पेलताना दोन बैलांनी अंग काढून घेतल्यावर आता सगळे काँग्रेसी कोसळलात तसे राज्याच्या राजकारणातही होईल. गाडीला कोणते दोन बैल जोडावे याचा आधीच विचार करा,’ असा टोला प्रदेश भाजपचे मुख्य प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी ट्विट करून लगावला आहे.

First Published on: July 10, 2021 11:14 PM
Exit mobile version