अकरावी प्रवेशाची दुसरी यादी लांबणीवर

अकरावी प्रवेशाची  दुसरी यादी लांबणीवर

प्रातिनिधिक फोटो

अकरावी ऑनलाइन प्रवेश प्रक्रियेची दुसरी गुणवत्ता यादी पुढे ढकलण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय सोमवारी शिक्षण उपसंचालक विभागाने जाहीर केला आहे. अकरावीच्या प्रवेशातील अल्पसंख्याक कॉलेज कोट्यातील जागांसंदर्भातील याचिका नागपूर खंडपीठात दाखल झाली. त्यामुळे ही यादी सोमवारी जाहीर झाली नाही.

आता गुरुवारी १९ जुलै रोजी यादी जाहीर करण्यात येणार आहे. कोर्टाच्या निर्णयानुसार अल्पसंख्याक कोटा आता अल्पसंख्याक विद्यार्थ्यांतूनच भरणे अनिवार्य करण्यात आले आहे. ही प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी दुसरी यादी पुढे ढकलण्यात आली आहे. अकरावी ऑनलाइन प्रवेश प्रक्रियेनुसार सोमवारी प्रवेशाची दुसरी गुणवत्ता यादी जाहीर करण्यात येणार होती. मात्र सोमवारी सकाळी अचानक शिक्षण उपसंचालक विभागाने ही यादी पुढे ढकलण्याचा निर्णय जाहीर केल्याने अनेक विद्यार्थ्यांना त्याचा धक्का बसला. मुळात अकरावी ऑनलाइन प्रवेशाबाबत उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने दिलेल्या आदेशानुसार आता अल्पसंख्याक ज्युनिअर कॉलेज आणि कॉलेजांनी अल्पसंख्याक 50 टक्के, इनहाउस 20 टक्के कोटा व व्यवस्थापन 5 टक्के या कोट्यातील जागा अल्पसंख्याक विद्यार्थ्यांतूनच भरणे अनिवार्य राहणार आहे. बिगर अल्पसंख्याक विद्यार्थ्यांना हा कोटा वगळता 25 टक्के इनहाउस विद्यार्थी असल्यास अथवा इनहाउस नसल्यास 45 टक्के जागांवर ऑनलाईन केंद्रीय पद्धतीतून अ‍ॅलॉटमेंट करण्यात येतील.

केंद्रीय प्रवेश प्रक्रियेच्या नियमित फेर्‍या संपल्यानंतर विद्यार्थी शिल्लक राहिल्यास या जागांवर विद्यार्थ्यांना अल्पसंख्याक ज्युनिअर कॉलेजातील कोट्याच्या रिक्त जागांवर ऑनलाइन केंंद्रीय प्रक्रियेतून प्रवेश देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यामुळे ही दुसरी गुणवत्ता यादी पुढे ढकण्यात आली आहे. या निर्णयामुळे अल्पसंख्याक कॉलेज, उच्च माध्यमिक विद्यालयांनी अल्पसंख्याक, इनहाउस, व्यवस्थापन कोट्यातील सर्व जागा पुन्हा संबधित व्यवस्थापनाकडे परत करण्यात येणार आहेत. त्या भरुन त्याची माहिती शिक्षण उपसंचालक विभागाकडे द्यावी लागणार आहे.

दरम्यान, या निर्णयामुळे गुणवंत विद्यार्थ्यांना पहिल्या यादीत नव्वदहून अधिक गुण मिळालेल्या विद्यार्थ्यांचे वर्चस्व राहिल्यामुळे अनेक नामवंत कॉलेजांमध्ये जवळपास ७० टक्के प्रवेश पूर्ण झाले आहेत. त्यात आता कोर्टाच्या या निर्णयामुळे अनेक विद्यार्थ्यांचा नामांकित कॉलेजांमधील प्रवेश धोक्यात आला आहे. त्यामुळे विद्यार्थी आणि पालकांमध्ये संभ्रामाचे वातावरण निर्माण झाले आहे. प्रवेशाच्या प्रतीक्षेत असलेल्या सर्व विद्यार्थ्यांचे लक्ष आता १९ जुलै रोजी जाहीर होणार्‍या यादीकडे लागून राहिले आहे.

First Published on: July 17, 2018 7:25 AM
Exit mobile version