गणेश विर्सजनाची संधी साधून चोरी करणाऱ्या पाच आरोपींना अटक

गणेश विर्सजनाची संधी साधून चोरी करणाऱ्या पाच आरोपींना अटक

गणपती विसर्जनादरम्यान मोबाईल चोरी करणार्‍या दोन टोळ्यांचा परिमंडळ चारच्या विशेष पथकाने पर्दाफाश केला. या दोन्ही टोळीतील पाच रेकॉर्डवरील आरोपींना पोलिसांनी अटक केली आहे. त्यांच्याकडून पोलिसांनी सोनसाखळीसह २२ चोरीचे मोबाईल जप्त केले आहेत. अटकेनंतर या पाचही आरोपींना लोकल कोर्टाने पोलीस कोठडी सुनावली आहे. मोनू श्रीगंगाचरण यादव, आकाश मोहरसिंग शंकवार, अरबाज सईद मिर्झा, नवगन हरि चव्हाण, रोहित उमेश जाधव अशी या पाच जणांची नावे असल्याचे पोलिसांनी सांगितले. ही टोळी गणपती विसर्जनाच्या दिवशी खास करून मोबाईल चोरीसाठी लालबाग परिसरात येत असल्याचे पोलीस तपासात उघडकीस आले आहे.

गणपती विसर्जनाच्या दिवशी गर्दीचा फायदा

गेल्या काही वर्षात लालबाग परिसरात गणपती विसर्जनादरम्यान उसळणार्‍या गर्दीचा फायदा घेऊन मोबाईलसह सोनसाखळी चोरीच्या गुन्ह्यांत लक्षणीय वाढ झाली होती. अशा गुन्ह्यांना आळा घालण्यासाठी अतिरिक्त पोलीस आयुक्त विरेश प्रभू, पोलीस उपायुक्त डॉ. सौरभ त्रिपाठी यांनी परिमंडळ चारच्या सर्वच पोलिसांना सतर्क राहण्याचे आदेश दिले होते. तसेच या पोलीस ठाण्याच्या निवडक पोलीस अधिकारी आणि कर्मचार्‍यांचे विशेष पथक तयार करुन अशा आरोपींवर लक्ष ठेऊन त्यांच्यावर कारवाई करण्याचे आदेश दिले होते. या आदेशानंतर या पथकाने गणपती विसर्जनाच्या दिवशी गर्दीचा फायदा घेऊन मोबाईल चोरी करणार्‍या मोनू यादव आणि आकाश शंकवार या दोघांना अटक केली.

नक्की वाचाव्हिडिओ कॉलवर केला महिलेचा विनयभंग; विकृताला अटक

नऊ मोबाईल आणि ३० ग्रॅम वजनाच्या सोनसाखळीसह अटक

पोलीस तपासात ते दोघेही उत्तर प्रदेशच्या फिरोजाबादचे रहिवाशी आहेत. या दोघांकडून चोरीचे तेरा मोबाईल पोलिसांनी हस्तगत केले आहे. ही घटना ताजी असताना दुसर्‍या पोलीस पथकाने अरबाज, नवगन आणि रोहित या तिघांना चोरीच्या नऊ मोबाईल आणि ३० ग्रॅम वजनाच्या सोनसाखळीसह अटक केली. पोलीस तपासात या दोन्ही टोळ्या गणपती विसर्जनाच्या दिवशी खास करुन लालबाग परिसरात येत होते. लालबागचा राजा आणि गणेश गल्लीच्या गणपती विसर्जनाला मोठ्या प्रमाणात भाविक येत असल्याने ते गर्दीचा फायदा घेऊन मोबाईलसह सोनसाखळी चोरी करीत होते. या पाचही आरोपींविरुद्ध अशा अनेक गुन्ह्यांची नोंद आहे. गणपती विसर्जन मिरवणूकीत ज्या भाविकांचे मोबाईल फोन चोरीस गेले आहे. त्यांनी काळाचौकी पोलिसांशी संपर्क साधावा, असे आवाहन आता पोलिसांकडून करण्यात आले आहे.

First Published on: September 14, 2019 7:20 PM
Exit mobile version