दहिसरच्या गणपत पाटील नगरची पाणी प्रतीक्षा मिटणार!

दहिसरच्या गणपत पाटील नगरची पाणी प्रतीक्षा मिटणार!

गणपत पाटील नगरात पाण्याच्या पाईपलाईनचा भूमिपूजन सोहळा

दहिसरमधील गणपत पाटील नगरची बहुचर्चित पाण्याची चिंता अखेर मिटली आहे. आजवर या झोपडपट्टीला अनधिकृत असल्याचे सांगत त्यावर बुलडोझर चालवणार्‍या महापालिकेने आता या झोपडपट्टीला अधिकृत पाणी पुरवण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे या भागात पाणी पुरवठा करण्यासाठी जलवाहिनी टाकण्याच्या कामाला सुरुवात झालेली आहे. त्यामुळे सध्या टँकरच्या पाण्यासाठी धावपळ करणार्‍या झोपडीधारकांना नळावर जावून पाणी भरता येणार आहे.

वडिलांची कारवाईची मागणी, मुलाने दिले हक्काचे पाणी!

दहिसर येथील खारफुटीच्या जागेवर भराव टाकून झोपड्या बांधल्या गेल्या आहे. गणपत पाटील नगर नावाने वसलेल्या या वस्तीला तत्कालीन लोकप्रतिनिधी कमलाकर पाटील आणि त्यानंतर काँग्रेसच्या नगरसेविका शीतल म्हात्रे यांचे संरक्षण असल्याचा आरोप केला जायचा. मागील २० वर्षांपूर्वी ही झोपडपट्टी वसलेली आहे. परंतु, तिवरांच्या झाडांच्या जागांवर भराव टाकून बांधलेल्या या अनधिकृत झोपड्यांवर महापालिकेच्या वतीने वारंवार कारवाई केली जायची. तसेच या झोपड्यांवर कारवाई करण्याची मागणी तत्कालीन शिवसेना आमदार विनोद घोसाळकर यांनी वारंवार केली होती. परंतु आता याच वस्तीला पाणी पुरवण्याचे काम घोसाळकर यांचा मुलगा अभिषेक घोसाळकर आणि नगरसेविका तेजस्विनी घोसाळकर यांच्या प्रयत्नाने आता होत आहे.


हेही वाचा – महापालिकेची कृपा; हॉटेल, स्विमिंग टँकला फुकटात पाणी!

२०००पूर्वीच्या सर्व झोपड्यांना मिळणार पाणी!

शिवसेना नगरसेविका तेजस्वी घोसाळकर यांच्या प्रयत्नाने महानगरपालिकेच्या माध्यमातून प्रभाग क्रमांक १ गणपत पाटील नगर येथे मुंबईतील पहिल्या खासगी झोपडपट्टीला ३० मीटर लांब आणि ६ इंच व्यासाची पाईपलाईन टाकण्याच्या कामाचा भूमिपूजन आणि स्थानिक नागरिकांना पाण्याच्या मीटरचे वाटप मुंबई इमारत व दुरुस्ती मंडळाचे अध्यक्ष विनोद घोसाळकर आणि मुंबई बँकेचे अध्यक्ष अभिषेक घोसाळकर यांच्या हस्ते पार पडले. गेल्या २० वर्षांपासून गणपत पाटील नगर परिसरात पाण्याची मोठ्या प्रमाणात समस्या होती. सदर झोपडपट्टीवसियांना टँकरद्वारे पाणी पुरवले जात होते. स्थानिक नगरसेविकेच्या प्रयत्नाने येथील नागरिकांना मोठा दिलासा मिळाला आहे. जलवाहिनीच्या या कामांमुळे गणपत पाटील नगरातील खासगी झोपडपट्टीचा पाण्याचा वनवास संपला असून आता प्रत्येक झोपडपट्टीवासियांना घरोघरी पाणी मिळण्याचे स्वप्न साकार झाल्याची प्रतिक्रिया नगरसेविका तेजस्वी घोसाळकर यांनी व्यक्त केली. २००० पूर्वीच्या सर्व झोपड्यांना पाणी पुरवठा करण्याचा प्रस्ताव महापालिकेने मंजूर केला आहे. त्यानुसार गणपत पाटील नगरला पाणी पुरवठा करण्याचा निर्णय घेतला असून अशा प्रकारे मुंबईतील सर्वच खासगी झोपडपट्टयांमधील २००० पूर्वीच्या रहिवाशांना पाणी पुरवठा केला जाणार असल्याचे त्यांनी सांगितले.

First Published on: July 22, 2019 10:20 PM
Exit mobile version