गणरायांच्या मूर्ती विसर्जनाचा भार यंदा कृत्रिम तलावांवरच!

गणरायांच्या मूर्ती विसर्जनाचा भार यंदा कृत्रिम तलावांवरच!

Angarki Sankashti Chaturthi 2021: काय आहे अंगारकी चतुर्थीची कथा? जाणून घ्या आजच्या चंद्रोदयाची वेळ

श्री गणरायांचे आगमन पुढील महिन्यात होत असून सरकारने यंदा गणेशोत्सव साधेपणाने साजरा करण्याचे निर्देश देत आगमन आणि विसर्जनाच्या मिरवणूका काढल्या जावू नये, अशा सूचना केल्या आहेत. मात्र, याबाबत येत्या तीन ते चार दिवसांमध्ये अंतिम निर्देश शासनाच्यावतीने जारी केले जाणार आहेत. मात्र, यंदा बाप्पांच्या मूर्तीचे विसर्जन चौपाट्या तसेच तलावांच्याठिकाणी होणार नसून यंदा जास्तीत जास्त कृत्रिम तलावांची निर्मिती करूनही मूर्तींचे विसर्जन केले जाणार आहे. यामध्ये गृहनिर्माण संस्थांच्या आवारांमध्ये अशाप्रकारे कृत्रिम तलाव निर्माण करण्यावर भर दिला जाणार आहे.

मुंबईत गिरगाव, दादर, शिवाजीपार्क, जुहू आदी चौपाट्यांसह ८४ विसर्जन स्थळांच्या ठिकाणी महापालिकेच्यावतीने गणेश मूर्ती विसर्जनाची व्यवस्था केली जाते. यासह मुंबईतील ३४ ठिकाणी कृत्रिम तलावांची व्यवस्था केली जाते. परंतु कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सुरक्षिततेचा उपाय म्हणून गर्दी टाळून सोशल डिस्टन्सिंगचे पालन करण्यासाठी यावर्षी गणरायांच्या आगमन आणि विसर्जन मिरवणुकांचे आयोजन न करण्याचे आवाहन सरकारने केले आहे. त्यामुळे यंदा चौपाट्यांसह तलावांच्या ठिकाणी विसर्जन सोहळयावर बंदी येणार आहे. त्यामुळे यंदा गणरायाच्या मूर्ती विसर्जनासाठी कृत्रिम तलावांचा आधार ठरणार आहे. मुंबई महापालिकेला सार्वजनिक गणेशोत्सवात मूर्ती विसर्जनाच्या दिवशी गर्दी टाळण्यासाठी आता कृत्रिम तलावांच्या निर्मितीवर भर द्यावा लागणार आहे. महापालिकेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार, कृत्रिम तलावांच्या निर्मितीसाठी आता जास्तीत जास्त लोकांमध्ये जनजागृती केली जाईल. सार्वजनिक गणेशोत्सवाच्या मूर्तीची उंची चार फुटांएवढीच असल्याने महापालिकेच्यावतीने बनवण्यात येणाऱ्या मोठ्या आकाराच्या कृत्रिम तलावांमध्ये याचे विसर्जन केले जावू शकते. परंतु घरगुती गणपतींच्या मूर्तीसाठीही सोसायटी आणि मोठ्या वस्तींशेजारील मोकळ्या जागांमध्ये कृत्रिम तलावांची निर्मिती करावी लागेल. परंतु सध्या सरकारच्या अंतिम आदेशानंतरच याबाबतची रुपरेषा ठरली जाईल,असे त्यांचे म्हणणे आहे.

दरम्यान, सरकारच्या आवाहनानंतर घाटकोपर येथील शिवसेना नगरसेविका अश्विनी दिपकबाबा हांडे यांनी आपल्या प्रभागासह घाटकोपर पश्चिम येथील आसपासच्या सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांच्या मूर्तीच्या विसर्जनासाठी येथील दत्ताजी साळवी मैदानात कृत्रिम तलाव उभारण्याची तयारी दर्शवली आहे. त्यामुळे कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आता लोकप्रतिनिधीही कृत्रिम तलाव निर्मितीसाठी पुढे येत आहेत.

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर प्रत्येक गृहनिर्माण सोसायट्यांच्या आवारात कृत्रिम तलावांची निर्मिती केली जावी. तसेच सार्वजनिक उत्सव मंडळाच्या परिसरांमध्येही अशाप्रकारे तलावांची निर्मिती केली जावी. मुंबई महापालिका ८४ विसर्जन स्थळांच्याठिकाणी व्यवस्था राखण्यासाठी कोट्यवधी रुपये खर्च करते. तो निधी यंदा वाचला जाणार असून त्यातील ५० टक्के निधी जास्तीत जास्त कृत्रिम तलावांच्या निर्मितीसाठी वापरला जावा. महापालिकेने ३४ कृत्रिम तलावांच्या तुलनेत ही संख्या प्रत्येक प्रभागांमध्ये प्रत्येकी दोन ते तीन एवढी करायला हवी. तसेच गृहनिर्माण संस्थांना अशाप्रकारे तलावांची निर्मिती करण्यासाठी महापालिकेने पुढाकार घ्यावा किंवा लोकप्रतिनिधींनी अशाप्रकारची सुविधा उपलब्ध करून दिल्यास विसर्जनातील विघ्न ही दूर होईल

अॅड. नरेश दहिबावकर, अध्यक्ष, बृहन्मुंबई सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ समन्वय समिती


हेही वाचा – बेरोजगार, महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना रोजगारविषयक मार्गदर्शनासाठी ऑनलाईन काउंसलिंग सत्र


 

First Published on: July 1, 2020 11:43 PM
Exit mobile version