सायन कोळीवाडा येथे बंद घरात गॅस सिलिंडरचा स्फोट; कोणीही जखमी नाही

सायन कोळीवाडा येथे बंद घरात गॅस सिलिंडरचा स्फोट; कोणीही जखमी नाही

सायन कोळीवाडा येथे बंद घरात गॅस सिलिंडरचा स्फोट

लालबाग येथे गॅस सिलिंडरचा स्फोट होऊन मोठी जीवित हानी झाल्याची घटना ताजी असतानाच सोमवारी सकाळी ११.४० वाजताच्या सुमारास सायन कोळीवाडा येथील एका चाळीतील बंद घरात गॅस सिलिंडरचा भीषण स्फोट झाला. सुदैवाने या घटनेत कोणीही जखमी झालेले नाही.  यासंदर्भात, मुंबई अग्निशमन दलाचे प्रमुख अधिकारी कैलास हिवराळे यांच्याकडे विचारणा केली असता, सायन कोळीवाडा, कोकरी आगार, डॉ. बाबासाहेब आंबेडकर नगर, रावळी कॅम्प येथील एका चाळीतील बंद घरात सोमवारी सकाळी ११.४० वाजताच्या सुमारास घरगुती गॅस सिलिंडरमधून गॅस गळती होऊन भीषण स्फोट झाला, अशी माहिती त्यांनी दिली.

या गॅस सिलिंडरच्या स्फोटामुळे आजूबाजूचा परिसर हादरला. सदर घराच्या भिंती, छप्पर , भांडी आदींचे नुकसान झाले. तर स्फोटामुळे आग लागल्याने त्यात घरातील काही सामान, इलेक्ट्रिक वायर आदी जळाले. या घटनेमुळे परिसरात काहीसे भितीचे वातावरण निर्माण झाले होते. या घटनेची माहिती मिळताच, अग्निशमन दलाच्या जवानांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेऊन मदतकार्य सुरू केले.

यावेळी, अग्निशमन दलाने पोलिसांच्या उपस्थितीत प्रथम बंद घराचा टाळा तोडला व आपले मदतकार्य सुरू केले, असे कैलास हिवराळे यांनी सांगितले. याप्रकरणी, स्थानिक पोलीस व अग्निशमन दलाचे अधिकारी हे अधिक तपास करीत आहेत.


 

सायबर पोलिसांचं आवाहन; WhatsApp येणाऱ्या ‘या’ लिंकवर क्लिक करू नका

First Published on: December 21, 2020 5:30 PM
Exit mobile version