हिरे व्यापारी हत्या: गृहनिर्माण मंत्री प्रकाश मेहतांच्या माजी ‘पीए’ला अटक

हिरे व्यापारी हत्या: गृहनिर्माण मंत्री प्रकाश मेहतांच्या माजी ‘पीए’ला अटक

सचिन पवार राज्याचे गृहनिर्माण मंत्री प्रकाश महेता यांचा पीए होता

घाटकोपर येथील हिरे व्यापारी राजेश्वर उदानी यांच्या हत्येनंतर आता नवनवीन खुलासे समोर येत आहेत. उदानी यांचा मृतदेह काल पनवेल येथे कुजलेल्या अवस्थेत सापडल्याने एकच खळबळ उडाली होती. याप्रकरणी घाटकोपरच्या पंतनगर पोलिसांनी भाजपचे नेते आणि राज्याचे गृहनिर्माण मंत्री प्रकाश मेहता यांच्या माजी स्वीय सहाय्यकाला अटक केली आहे. सचिन पवार असे संशयित आरोपीचे नाव असून पोलीस त्याची कसून चौकशी करत आहेत. दरम्यान प्रकाश मेहता यांनी सचिन पवार हा फार पुर्वी माझा सहकारी होता, हे मान्य केले असले तरी मागच्या बऱ्याच वर्षांपासून आपला त्याच्याशी काहीही संबंध आला नसल्याचेही सांगितले आहे.

काय म्हणाले प्रकाश मेहता –

सचिन पवारला पोलिसांनी अटक केल्यानंतर प्रकाश मेहता यांनी माध्यमांसमोर येऊन आपली भूमिका मांडली आहे. ते म्हणाले की, “२००९ – १० दरम्यान तो माझा सहकारी होता. मात्र त्यानंतर तो माझ्यासोबत काम करत नव्हता. भाजप पक्षाचा सदस्य म्हणून त्याने काम केलेले आहे. मात्र २०१२ मध्ये पक्षविरोधी कारवाई केल्यामुळे त्याला पक्षातून काढूण टाकण्यात आले होते. २०१७ साली तो पुन्हा भाजपमध्ये आला होता आणि त्याच्या पत्नीने भाजपच्या तिकिटावर निवडणूक लढवली होती. घाटकोपर मधील व्यापाऱ्याची हत्येची घटना भयानक असून जे आरोपी असतील त्यांना कठोर शासन झाले पाहीजे. आम्हाला राजकीय जीवनात काम करत असताना हजारो कार्यकर्ते भेटतात. मात्र ते वैयक्तिक जीवनात काय करतात? याबद्दल माहिती ठेवणे कठिण आहे.”

सचिन पवारचे अनेक भाजप नेत्यांसोबत संबंध

सचिन पवार भाजपचे मुंबई अध्यक्ष आशिष शेलार यांच्यासोबत
प्रकाश मेहता यांचा माजी स्वीय सहाय्यक भाजपचा कार्यकर्ता होता. त्याचे अनेक भाजप नेत्यांसोबत फोटो आहेत.
First Published on: December 8, 2018 1:23 PM
Exit mobile version