इंदापूरपर्यंतच्या कामासाठी २०० कोटी द्या

इंदापूरपर्यंतच्या कामासाठी २०० कोटी द्या

मुंबई-गोवा महामार्गाचे काम अतिशय संथगतीने सुरू आहे. या महामार्गातील पळस्पे ते इंदापूर या पहिल्या टप्प्यातील डांबरीकरण पावसामुळे उखडल्याने रस्ता पुरता खराब झाला आहे. पहिल्या टप्प्याचे काँक्रिटीकरण करणे हाच यावर पर्याय असल्याचा दावा करत रायगडचे खासदार सुनील तटकरे यांनी या कामासाठी २०० कोटी रुपयांची तरतूद करावी, अशी मागणी केंद्रिय बांधकाम मंत्री नितीन गडकरी यांच्याकडे केली अहे. तटकरे यांनी केलेल्या मागणीनंतर गडकरी यांनी याकामी येत्या मंगळवारी दिल्लीत विशेष बैठक बोलावल्याची माहिती खा. सुनील तटकरे यांनी दिली.

काँक्रिटीकरण करताना जो रस्ता सुस्थितीत आहे, तो तसाच ठेवावा. खराब झालेला रस्ता आणि अपूर्ण असलेल्या रस्त्याचे काँक्रिटीकरण करावे, अशी सूचना त्यांनी केली. या कामाकरिता २०० कोटी रुपयांची तरतूद करण्याचेही त्यांनी सुचवले. इंदापूर ते परशुराम घाटाकडे जाणारा रस्ता आहे. त्यातील कशेडी घाटातील एंट्री आणि एक्झिट पॉइंटवर सुशोभीकरण करावे. लोटे परशुराम एमआयडीसी क्षेत्र मोठे आहे. या ठिकाणी गुणाडे येथे अंडरपास रस्ता करणे गरजेचे आहे. त्यामुळे परिसरातील २५ गावांतील नागरिकांना त्याचा फायदा होणार असल्याचे तटकरे यांनी स्पष्ट केले.

इंदापूर ते झाराप या दुसर्‍या टप्प्यातील भूसंपादनासाठी जमिनीला चार पट मोबदला दिला जात आहे. या मोबदल्याची रक्कम खूप होते. त्याबाबत गडकरी यांनी राज्य सरकारला पत्र लिहिले आहे. या विषयावरही ११ ऑक्टोबर रोजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आणि स्वतः मी या बैठकीला उपस्थित असणार आहोत. त्या बैठकीमध्ये भूसंपादनाचा प्रश्न मार्गी लावण्यात येणार असल्याचेही तटकरे यांनी स्पष्ट केले.

First Published on: October 3, 2021 6:10 AM
Exit mobile version