देवी भक्तीची उपासक, डीजे आणि लाऊडस्पीकरची गरज काय? न्यायालयाचा सवाल

देवी भक्तीची उपासक, डीजे आणि लाऊडस्पीकरची गरज काय? न्यायालयाचा सवाल

मुंबई – नवरात्रौत्सवात गरबा-दांडियाला उत्साह असतो. लाऊडस्पीकर आणि डिजेच्या तालावर गरबा रसिक आनंद लुटत असतात. मात्र, मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने महत्त्वाची टीप्पणी केली आहे. नवरात्रीच्या काळात आदिशक्तीची पूजा केली जाते. त्यासाठी ध्यान करावे लागते आणि ध्यान लावणे गोंगाटात शक्य नसते. त्यामुळे गरबा, दांडियासाठी डीजे, लाऊडस्पीकर यांसारख्या अत्याधुनिक साउंड सिस्टीमची आवश्यकता नाही, असं मत नागपूर खंडपीठाने मांडलं आहे.

ध्वनीप्रदूषण नियम २००० अंतर्गत शांतता क्षेत्र म्हणून घोषित केलेल्या खेळाच्या मैदानावर दांडिया, गरबा खेळला जात असल्याने तेथे साऊंड सिस्टिमचा वापर करण्यास मनाई करावी, अशी याचिका उच्च न्यायालयात दाखल करण्यात आली होती. यावर निकाल देताना मुंबई उच्च न्यायालायने महत्त्वाची टीप्पणी केली आहे.  ‘दांडिया आणि गरबा हे धार्मिक उत्सवाचा अंगभूत भाग असल्याने अजूनही पूर्णपणे पारंपारिक आणि धार्मिक पद्धतीने सादर केले जाऊ शकतात. त्यासाठी लाऊडस्पीकर, डीजेसारख्या आधुनिक साउंड सिस्टीमची आवश्यकता नाही,’ असं नागपूर खंडपीठाने म्हटलं आहे.

हेही वाचा – शिवध्वज रथयात्रेचा सप्तश्रृंग गडावर प्रारंभ
नवरात्रात आपण जी पूजा करतो ते शक्तीचे रुप आहे. शक्तीदेवतेची उपासना एकाग्र मनाने कोणताही संकोच न बाळगता केली पाहिजे. त्यासाठी सभोवतालच्या वातावरणामुळे एकाग्रता भंग न होता व इतरांना कोणताही त्रास न देता भक्ती केली पाहिजे. त्यामुळे देवीची पूजा गोंगाटात, इतरांना त्रास होईल अशा पद्धतीने केली तर मन एकाग्र ठेवून पूजा कशी करता येईल?असा प्रश्न मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने उपस्थित केला आहे.

शरीराची आणि मनाची सर्व शक्ती देवीकडे केंद्रीत केली तरच देवीची पूजा शक्य आहे. खरा भक्त आपली भक्ती व पूजा विचलित न होता व इतरांना त्रास न देता करू इच्छितो. त्यामुळे साहजिकच, खरा भक्त बाहेरील जगाकडून कोणताही व्यत्यय न येता भक्ती करू इच्छितो आणि तो त्याची भक्ती किंवा उपासना करताना अन्य कोणाला त्रास देत नाही, असं खंडपीठाने नमूद केलं आहे.

हेही वाचा – यात्रेच्या आठवणी : पाळण्यात बसण्याची विशेष हौस; चक्रीचीही मजा काही औरच!

देवीची पूजा अत्यंत काळजीपूर्वक केली पाहिजे. भक्ताने आपल्या कृतीद्वारे उत्सवाची शिस्त आणि पावित्र्याचे जपले जाईल याची काळजी घ्यावी, असेही न्यायालयाने म्हटले. गरबा व दांडीया हे पारंपरिक पद्धतीने सण साजरा करण्याचा एक मार्ग आहे. हिंदू धर्मातील एका मोठ्या वर्गाने देवतेवरची भक्ती व्यक्त करण्याचा हा एक मार्ग मानला आहे, असेही निकालात नमूद केले आहे.

शांतता क्षेत्रात कोणताही सण साजरा केला जाऊ नये, असे नाही. न्यायालयाने आयोजकांना संबंधित मैदानावर नवरात्रौत्सव साजरा करण्याची परवानगी दिली. पण, त्यावेळी डीजे, लाऊडस्पीकर आणि अन्य साऊंड सिस्टिमचा वापर न करण्याचे निर्देश न्यायालयाने दिले आहेत.

First Published on: September 30, 2022 4:40 PM
Exit mobile version