साकीनाका येथे हार्डवेअर दुकानाला भीषण आग, दोघांचा होरपळून मृत्यू

साकीनाका येथे हार्डवेअर दुकानाला भीषण आग, दोघांचा होरपळून मृत्यू

साकीनाका : मुंबईमधील अंधेरी साकीनाका परिसरातील हार्डवेअरच्या दुकानामध्ये लागलेल्या आगीत दोघांचा होरपळून मृत्यू झाला आहे. राकेश गुप्ता आणि गणेश देवासी अशी मृतांची नावे आहेत. आग लागली तेव्हा दुकानात अकरा कामगार झोपले होते. त्यापैकी नऊ कामगारांना सुरक्षितरित्या बाहेर काढण्यात यश आले, मात्र दोन जण अडकून पडल्यामुळे त्यांचा होरपळून मृत्यू झाला. या आगीवर नियंत्रण मिळवण्यात अग्निशमन दलाला यश आले आहे.

अंधेरीच्या साकीनाका परिसरातील मेट्रो स्टेशनच्या जवळ असलेल्या हार्डवेअरच्या दुकानाला आज पहाटे दोनच्या सुमारास आग लागली. या आगीत हार्डवेअर दुकान आणि त्याच्या शेजारील दुकान जळून खाक झाले आहे. आग लागल्याची माहिती मिळताच पोलीस आणि अग्निशमन दलाचे कर्मचारी त्या ठिकाणी पोहचले. आग एवढी भीषण होती की अग्निशमन दलाच्या कर्मचाऱ्यांना अथक प्रयत्न करावे लागले. साधारण साडेतीनच्या सुमारास आग आटोक्यात आली, मात्र पाच वाजता पुन्हा आगीचा भडकली आणि या आगीत दोन दुकाने जळून खाक झाली आहेत. ही आग विझवण्यात आली असून कुलिंगचे काम सध्या सुरु आहे.

हेही वाचा – विधान परिषद विरोधी पक्षनेते शिंदे गटात जाण्याची चर्चा, अंबादास दानवे माध्यमांसमोर येऊन म्हणाले…

मुंबई अग्निशमन दलाने या आगीला लेव्हल-1 असल्याचे घोषित केले आहे. आगीवर नियंत्रण मिळवल्यानंतर कर्मचाऱ्यांनी दुकानात प्रवेश केला असता राकेश गुप्ता भाजलेल्या अवस्थेत त्यांना सापडून आला. त्याला राजावाडी रुग्णालयात दाखल केले असता डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले, तर दुकानात गणेश देवासी याचाही मृतदेह सापडला आहे.

दुकानात प्रवेश करण्यास अडचण
शॉर्ट सर्किटमुळे लागलेल्या आगीत दुकानाचे कोट्यवधी रुपयांचे नुकसान झाले आहे. दोन मजली असलेल्या दुकानात इलेक्ट्रिक वायरिंग, इलेक्ट्रिक इन्स्टॉलेशन्स आणि इतर साहित्य जळून खाक आल्याची माहिती अग्निशमन दलाने दिली. दुकानाच्या आतील मजले कोसळल्यामुळे दुकानात प्रवेश करण्यास अडचण निर्माण झाली होती. त्यामुळे दुकानाचा पुढील भाग जेसीबीच्या सहाय्याने तोडून आत प्रवेश केल्याचे त्यांनी सांगितले.

First Published on: March 27, 2023 1:49 PM
Exit mobile version